५७ हजार विद्यार्थ्यांचे वर्ष वाचले
By admin | Published: August 26, 2015 01:44 AM2015-08-26T01:44:34+5:302015-08-26T01:44:34+5:30
दहावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-आॅगस्ट २०१५ मध्ये पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या
पुणे : दहावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-आॅगस्ट २०१५ मध्ये पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या फेरपरीक्षेचा आॅनलाइन निकाल मंगळवारी जाहीर झाला. एकूण निकाल २५.३७ टक्के लागला असून, ३५ हजार ३४६ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. तब्बल ५७ हजार ५१७ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचले, तर एकूण १ लाख ७ हजार २६ विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.
उत्तीर्ण झालेल्यांना गुणपत्रिका मिळाल्यानंतर चालू शैक्षणिक वर्षात आॅफलाइन पद्धतीने प्रवेश घेता येईल. त्यासाठी नजीकच्या जागा रिक्त असलेल्या महाविद्यालयांत जाऊन प्रवेशासाठी अर्ज करावा लागेल. ३१ आॅगस्टला दुपारी ३ वा. गुणपत्रिकांचे वाटप होणार असून, ३१ आॅगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान गुणपडताळणीसाठी अर्ज करता येईल. उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी २५ आॅगस्ट ते १४ सप्टेंबरदरम्यान अर्ज करता येईल.
५७ हजार ५१७ विद्यार्थ्यांना फायदा !
राज्यातील १ लाख ४० हजार १२१ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यातून परीक्षा देणाऱ्या १ लाख ३९ हजार ३२९ विद्यार्थ्यांपैकी ३५ हजार ३४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. फेरपरीक्षेमुळे दुसरी संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ४० हजार ३३४ विद्यार्थी केवळ एका विषयात अनुत्तीर्ण झाले आहेत.
दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३१ हजार ३४६ इतकी आहे. त्यामुळे एकूण पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ७ हजार २६ विद्यार्थी इतकी आहे.
एकूण विद्यार्थ्यांमधील ४९ हजार ५०९ विद्यार्थी मार्च २०१५ साली झालेल्या परीक्षेत एटीकेटीनुसार अकरावीसाठी पात्र झाले होते. परिणामी जुन्या पात्र विद्यार्थ्यांची संख्या वगळली असता एकूण ५७ हजार ५१७ विद्यार्थ्यांना नव्या नियमाचा फायदा झाला आहे.
‘लोकमत’लाही श्रेय
कर्नाटकात दहावी, बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी तातडीने फेरपरीक्षा होते, हे ‘लोकमत’ने शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या निदर्शनास आणून देत त्याचा पाठपुरावाही केला होता. त्यावर तावडे यांनी १५ दिवसांत फेरपरीक्षेचा निर्णय जाहीर केला होता.
मार्चमध्येच परीक्षा
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये या हेतूने आॅक्टोबर महिन्याऐवजी जुलै-आॅगस्ट महिन्यात दहावीची परीक्षा घेण्यात आली. त्यामुळे पुन्हा आॅक्टोबर महिन्यात परीक्षा घेतली जाणार नाही. परिणामी, विद्यार्थ्यांना मार्च २०१६मध्ये होणारी दहावीची परीक्षा द्यावी लागणार आहे.
विभागनिहाय निकाल
मंडळनोंदविलेलेउत्तीर्णटक्केवारी
मुंबई३२,७३२५,८००१७.८४
पुणे१९,०१५४,९४०२६.२०
नागपूर१६९४१५२६६३१.२०
औरंगाबाद१७०३५४६८८२७.६५
कोल्हापूर९४९३२०६३२१.८०
अमरावती१७६८८५७८०३२.८०
नाशिक१२८३८३२४७२५.४९
लातूर१३००४३३९३२६.२०
कोकण१३७५१६९१२.५३
ज्या जिल्ह्यांत अकरावीच्या जागा कमी आहेत, तेथील जागा पाच टक्क्यांनी वाढविण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. तसेच पुढील शैक्षणिक वर्षापासून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत समुपदेशन करण्यात येईल. - विनोद तावडे, शिक्षणमंत्री