वाचन प्रेरणा दिनास आता वाचन चळवळीचे स्वरूप प्राप्‍त, शाळा-महाविद्यालयांसह इतर संस्थांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 03:07 PM2017-10-11T15:07:04+5:302017-10-11T15:07:14+5:30

माजी राष्ट्रपती दिवंगत ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने दोन वर्षांपूर्वी घेतला.

Reading inspiration day, now get the form of reading movement, and participation of other organizations with schools and colleges | वाचन प्रेरणा दिनास आता वाचन चळवळीचे स्वरूप प्राप्‍त, शाळा-महाविद्यालयांसह इतर संस्थांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग

वाचन प्रेरणा दिनास आता वाचन चळवळीचे स्वरूप प्राप्‍त, शाळा-महाविद्यालयांसह इतर संस्थांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग

Next

मुंबई -  माजी राष्ट्रपती दिवंगत ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने दोन वर्षांपूर्वी घेतला. याच अनुषंगाने याही वर्षी सर्वच स्तरांवर वाचनाची आवड वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारचे उपक्रम साजरे केले जाणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी एका पत्रकाद्वारे दिली.

१५ ऑक्टोबर रोजी रविवार असल्यामुळे आणि लगेचच दिवाळीची सुट्टी सुरू होत असल्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये १३ व १४ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन आणि वाचन संस्कृतीसंबंधित विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. साहित्यिक, सांस्कृतिक संस्था आणि खासगी व सार्वजनिक ग्रंथालये १५ रोजी कार्यक्रम योजत आहेत.  वाचन प्रेरणा दिन हा दिवस नो गॅझेट डे म्हणून कृतीत आणण्याचे आवाहनही मराठी भाषा विभागाने केले आहे.

वाचन प्रेरणा दिन या उपक्रमाला आता चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले असून, यंदाही हा दिन साजरा करण्याच्या दृष्टीने शाळा,  महाविद्यालये, ग्रंथालये यांच्यासह सामाजिक-सांस्कृतिक-साहित्यिक संस्थांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढतो आहे. संपूर्ण महाराष्ट्रात शेकडो शैक्षणिक व सामाजिक संस्थांनी संबंधित कार्यक्रम आयोजित केले आहेत.

शैक्षणिक संस्था व वाचनालये-ग्रंथालयांसह आंबेडकरी साहित्य कला अकादमी (यवतमाळ), ग्रंथ तुमच्या दारी (कुसुमाग्रज प्रतिष्ठान), नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड्स, महाराष्ट्रीय मंडळ (पुणे), वाचनानंद पुस्तकभिशी (कोल्हापूर), विवेकानंद प्रतिष्ठान (जळगाव), व्यास क्रिएशन्स (ठाणे),  स्नेह परिवार (देवरुख), एक कविता अनुदिनी (व्हॉट्सअ‍ॅप गट), वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान (कणकवली), स्नेहालय (अहमदनगर), विदर्भ संशोधन मंडळ (नागपूर), नामांकित नियतकालिके इत्यादी वेगळ्या संस्थानी वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केले आहेत. कविवर्य विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संबंधित कार्यक्रम, समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) सखोल साहित्यिक चर्चा, ह्यपुस्तक द्यावे-पुस्तक घ्यावे योजनाह्ण, क्रीडाविषयक साहित्यावर परिसंवाद, पुस्तकभिशी फोडणे, ह्यपुस्तकांचं गाव (भिलार) प्रकल्पाची माहिती देण्याचा उपक्रम, दिव्यांग मुलांसाठी बोलक्या पुस्तकांचे श्रवण, वाचन प्रेरणा सप्ताह, प्राचीन-दुर्मीळ ग्रंथ हाताळण्याची संधी, फिरत्या ग्रंथालयाचे उद्घाटन, निरंतर वाचन...आदी आगळेवेगळे उपक्रम राज्यभरात होणार आहेत, अशीही माहिती विनोद तावडे यांनी दिली.

डॉ. सदानंद मोरे, प्रमोद पवार, अभिराम भडकमकर, लक्ष्मीकांत धोंड, श्याम जोशी, आबा पाटील, योगेश सोमण, राजन गवस, धनवंती हर्डीकर, मिलिंद लेले, डॉ. गणेश राऊत, भाषा संवर्धक बेबीताई गायकवाड, संगीता बर्वे, राहुल सोलापूरकर इत्यादी मान्यवर विविध ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच शिक्षक, प्राध्यापक, भाषा व साहित्य चळवळीतील कार्यकर्ते अनेक ठिकाणी वाचनविषयक विविधांगी उपक्रम योजत आहेत.

वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने ई-बुकचे सामूहिक वाचन निवडक कथा, कविता आणि उतारे यांचे अभिवाचन, प्रकाशक, वितरक, ग्रंथालये यांच्या सहकार्याने पुस्तकांचं प्रकाशन आदी कार्यक्रमही योजण्यात आले आहेत.  सार्वजनिक कार्यक्रमात पाहुण्यांना बुके नाही बुक ही पुस्तक भेट देण्याच्या सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, जेणेकरुन पुस्तकांचा प्रसार जास्तीतजास्त प्रमाणात होईल, असे आवाहनही विनोद तावडे यांनी केले आहे.

मंत्रालयातील सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी १३ ऑक्टोबर रोजी वाचनाचा आनंद लुटणार आहेत. सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत अधिकारी व कर्मचारी यांच्याकरीता ग्रंथ वाचन तास व ग्रंथ प्रदर्शन हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य म्हणून वाचनाची सामूहिक प्रेरणा मिळावी या उद्देशाने एकाच ठिकाणी वाचनाची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याकरीता वाचकांनी आपले स्वत:चे एखादे पुस्तक सोबत आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच त्रिमूर्ती प्रांगणात वाचनासाठी निवडक पुस्तकेही उपलब्ध करून देण्यात येतील.  यंदा वाचन प्रेरणा दिन आयोजित करताना केवळ व्याख्याने स्वरुपात हा दिन साजरा करण्याऐवजी वाचन संस्कृती संबंधित विषयावर चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळा, सामूहिक व वैयक्तिक वाचन आदि प्रकारचे कृतीशील व सहभागात्मक  कार्यक्रमांचे प्रमाण वाढत आहे, असे प्रतिपादन विनोद तावडे यांनी केले.

पुस्तकांच्या गावातही (भिलार येथे) साहित्यिकांशी व मान्यवर कलाकारांशी संवाद साधण्याची संधी वाचक-रसिकांना मिळणार असून, १५ ऑक्टोबर रोजी दु. ३.०० ते सायं. ५.३० या वेळात साहित्यिक, रसिकांशी पुस्तकांविषयी मनमोकळ्या गप्पा मारणार आहेत, असे तावडे यांनी सांगितले. बोरिवली येथे रेल्वे स्थानकावरील हमालांना पुस्तके भेट देण्यात येणार असून, फिरत्या ग्रंथालयाचे उद्घाटनही होणार आहे. शैक्षणिक-सामाजिक-सांस्कृतिक संस्थांसह सर्वसामान्य नागरिकांनीही वाचन प्रेरणा दिनी उत्साहाने सहभाग घ्यावा, असे आवाहन विनोद तावडे यांनी केले.

Web Title: Reading inspiration day, now get the form of reading movement, and participation of other organizations with schools and colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.