व्यासपीठावर शिवसेना नेते असताना युतीबद्दल स्पष्टच बोलले नितेश राणे; उपस्थितांच्या भुवया उंचावल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 02:52 PM2021-07-11T14:52:24+5:302021-07-11T14:53:38+5:30

भाजप आमदार नितेश राणेंच्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा

ready for alliance if party leadership decides says bjp mla nitesh rane in presence of shiv sena leaders | व्यासपीठावर शिवसेना नेते असताना युतीबद्दल स्पष्टच बोलले नितेश राणे; उपस्थितांच्या भुवया उंचावल्या

व्यासपीठावर शिवसेना नेते असताना युतीबद्दल स्पष्टच बोलले नितेश राणे; उपस्थितांच्या भुवया उंचावल्या

Next

सिंधुदुर्ग: शिवसेना आणि राणे यांचं नातं सर्वश्रुत आहे. शिवसेना आणि राणे यांच्यामधून विस्तवही जात नाही. कॅबिनेट मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन पुत्र कायम शिवसेनेला लक्ष्य करतात. भारतीय जनता पक्षाचे आमदार असलेले नितेश राणे तर सातत्यानं शिवसेनेला लक्ष्य करतात. मात्र सिंधुदुर्गमध्ये आयोजित एका कार्यक्रमात नितेश राणेंनी शिवसेनेबद्दल केलेल्या विधानामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित होते.

सिंधुदुर्गमधील सागररत्न बाजारपेठेचा लोकार्पण सोहळा काल संपन्न झाला. त्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला भाजप आमदार नितेश राणे, शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर आणि अन्य नेते उपस्थित होते. यावेळी नितेश राणेंनी केलेल्या भाषणाची सध्या जिल्ह्यात चर्चा आहे. व्यासपीठावर असलेले शिवसेना, भाजपचे नेते पाहून आता पुन्हा युतीची चर्चा सुरू होईल. सिंधुदुर्गाच्या, कोकणच्या, राज्याच्या विकासासाठी पक्षानं युतीचा आदेश दिल्यास पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता खांद्याला खांदा लावून काम करेल, असं विधान नितेश राणेंनी केलं.

'काही दिवसांपूर्वी राज्यात युतीची चर्चा सुरू होती. त्यानंतर ती बंद झाली. मात्र आता भाजप, शिवसेनेचे नेते एकाच व्यासपीठावर आल्यानं युतीचे चाहते सुखावले असतील. आज रात्री त्यांना चांगली झोप लागेल,' असं राणे म्हणाले. 'कोकणच्या, राज्याच्या विकासासाठी पक्ष नेतृत्त्वानं एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यास सगळे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करतील,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेवर कायम टीका करणाऱ्या नितेश राणेंच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

केंद्रीय कॅबिनेटमंत्री झाल्यावर काय म्हणाले नारायण राणे?
भाजप-शिवसेनेनं हिंदुत्व किंवा आणखी कोणत्या मुद्द्यावरून एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यास तुम्ही काय करणार?, असा प्रश्न राणे यांना केंद्रात मंत्रिपद स्वीकारण्यात आल्यानंतर विचारण्यात आला. त्यावर भाजप नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. याबद्दल पक्षाचं नेतृत्व जो निर्णय घेईल त्यासाठी आम्ही तयार असू, असं उत्तर राणेंनी दिलं. 

Web Title: ready for alliance if party leadership decides says bjp mla nitesh rane in presence of shiv sena leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.