‘सायबर गुन्हेगारीच्या मुकाबल्यासाठी सज्ज’
By admin | Published: December 21, 2015 02:00 AM2015-12-21T02:00:28+5:302015-12-21T02:00:28+5:30
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पहिले अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज असे सायबर क्राइम पोलीस स्टेशन उभे राहिले.
मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पहिले अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज असे सायबर क्राइम पोलीस स्टेशन उभे राहिले. गेल्या काही वर्षांत आॅनलाइन गुन्हेगारीही वाढत आहे. या गुन्हेगाराचा मुकाबला करण्यासाठी मुंबई सायबर सेल टीम सज्ज असल्याचे मुंबई पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी म्हटले आहे.
‘सायबर सिक्युरिटी आणि सेफ्टी’ या विषयावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, तेथे जावेद यांनी हे वक्तव्य केले. वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई, आॅल इंडिया असोसिएशन आॅफ इंडस्ट्रीज आणि यूएस-इंडिया इन्व्हेस्टरर्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जावेद म्हणाले, ‘सोशल मीडिया आणि आॅनलाइन ट्रॅन्झॅक्शनच्या वाढत्या वापरामुळे सायबर क्राइमचा मुद्दा जटिल बनत आहे. त्यामुळे विविध प्रकारचे गुन्हे सध्या घडत आहेत. या गुन्ह्यांचा मागोवा घेण्यासाठी मुंबई पोलिसांचा सायबर सेल कार्यक्षम आहे. सध्या या सेलला आणखी अद्ययावत करण्यासाठी आम्ही काम सुरू केलेले आहे. त्यासाठी परदेशी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. मुंबई पोलीस परदेशी संस्थांशी संपर्क ठेऊन आहेत. त्यांच्याकडून आवश्यक ते प्रशिक्षणही घेतले जात आहे.’ (प्रतिनिधी)