सरकारच्या कारवायांचा मुकाबला करण्यास तयार; विरोधी पक्षनेते फडणवीसांनी दिलं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 07:53 AM2022-03-26T07:53:57+5:302022-03-26T07:54:51+5:30
राज्य पोलिसांचा दुरुपयोग करून भाजपच्या नेत्यांवर सूडबुद्धीने कारवाया; फडणवीसांचा आरोप
मुंबई : राज्य पोलिसांचा दुरुपयोग करून भाजपच्या नेत्यांवर सूडबुद्धीने कारवाया केल्या जात असून सरकारच्या या अहंकारी वृत्तीचा मुकाबला करण्यास आम्ही तयार आहोत, असे आव्हान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. अधिवेशनानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या अधिवेशनात सरकार पुरते उघडे पडले असे ते म्हणाले.
प्रवीण दरेकर यांच्याविरोधात सहकार खात्याची कोणतीही तक्रार नव्हती. पण पोलिसांनी त्यांच्याविरोधात सुमोटो कारवाई केली. आता आम्ही प्रत्येक जिल्ह्यात बँका, साखर कारखान्यामध्ये मजूर, माथाडी, पगारदार संस्थांमधून संचालक झालेले कितीजण आहेत याची यादी तयार केली आहे. ती जाहीर करू. मग पोलिसांनी त्यांच्यावरही सुमोटो गुन्हे दाखल करावेत, असे आव्हान फडणवीस यांनी दिले.
‘त्या’ कंपनीचा मिर्चीशी संबंध नाही
भाजपला इक्बाल मिर्चीकडून १० कोटी रुपये मिळाल्याच्या नाना पटोले यांच्या आरोपावर फडणवीस म्हणाले की, त्यांनी पुरावे द्यावेत. ज्या कंपनीकडून पैसे मिळाल्याचे सांगितले जात आहे, तिचा इक्बाल मिर्चीशी काहीएक संबंध नाही.
पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून मुंबईत
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजले. पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून मुंबईत होईल, अशी घोषणा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी विधानसभेत केली.
सत्तेसाठी लाचार
मुंबई बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिमच्या माणसांशी आर्थिक व्यवहार, मनीलाँड्रिगचे व्यवहार करणारे नवाब मलिक यांचा बचाव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केला. सत्तेसाठी ते किती लाचार आहेत, याची प्रचिती आल्याची टीका फडणवीस यांनी केली.
‘ते सोबत असते तरी कारवाई झालीच असती’
पहाटेच्यावेळी झालेला शपथविधी यशस्वी झाला असता तर नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्या मांडीला मांडी लावून बसावे लागले असते, असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी हाणला होता. त्यावर विचारले असता फडणवीस म्हणाले की, आमच्या बाजूला बसणाऱ्यांवर आमचे नियंत्रण असते. आणि समजा आमच्या शेजारी बसणारे दोषी आढळले असते तर कडक कारवाई केली असती. आज तेच त्यांच्याबरोबर आहेत म्हणून कारवाई सौम्य झाली आहे. त्यांच्याबरोबर न राहिल्याने आम्ही संकटातून वाचलो असे नाही. उलट ते जास्त संकटात आले असते. आम्ही खूप संकटे झेलले आहेत.