म्हाडामुळे ९७२ जणांचे गृहस्वप्न साकार
By Admin | Published: August 11, 2016 04:30 AM2016-08-11T04:30:17+5:302016-08-11T04:30:17+5:30
घर असावे घरासारखे’ असे स्वप्न घेऊन किंवा ‘कुणी घर देता का घर?’ या चिंतेतून म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज केलेल्या १ लाख ३६ हजार ५७७ जणांपैकी ९७२ जणांचे मुंबईतील घरांचे स्वप्न बुधवारी साकार
मुंबई : ‘घर असावे घरासारखे’ असे स्वप्न घेऊन किंवा ‘कुणी घर देता का घर?’ या चिंतेतून म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज केलेल्या १ लाख ३६ हजार ५७७ जणांपैकी ९७२ जणांचे मुंबईतील घरांचे स्वप्न बुधवारी साकार झाले. वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात जमलेल्या उत्सुक गर्दीतील काहींच्या डोळ््यांत आनंदांश्रू तरळले, तर काहींना निराश होऊन परतावे लागले.
मुंबई शहर आणि उपनगरा७तील म्हाडाच्या घरांसाठी बुधवारी सोडत काढण्यात आली. सकाळी ९ वाजता सुरू झालेला हा सोडतीचा कार्यक्रम दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु होता. म्हाडाच्या अधिकाऱ्यांमधून नेमण्यात आलेल्या पंचांसह उपस्थित प्रेक्षकांमधून निवडण्यात आलेल्या तीन पंचाच्या उपस्थितीत घरांच्या सोडतीचा सोहळा पार पडला. सोडतीचा कार्यक्रम पाहण्यासाठी दाखल झालेल्या अर्जदारांमुळे रंगशारदा सभागृहात चैतन्य निर्माण झालेले होते. आजच्या सोडतीत आपल्याला घर लागते की नाही, याची उत्सुकता अर्जदारांना लागलेली होती.
ज्या अर्जदारांना सभागृहात प्रवेश मिळाला नाही; अशा अर्जदारांना सोडतीचे थेट प्रेक्षपण पाहता यावे, म्हणून सभागृहाबाहेरील परिसरात मंडप उभारण्यात आला होता. येथे चार ते पाच स्क्रीनवर सोडतीचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येत होते. शिवाय यशस्वी अर्जदारांच्या नावांचा उल्लेख असलेल्या प्रिंटआऊट मंडपातील फलकावर प्रदर्शित करण्यात येत होत्या, त्यामुळे सभागृहासह बाहेर उभारण्यात आलेल्या मंडपातही अर्जदारांची गर्दी झाली होती. यामध्ये पुरुषांसह महिलांचा विशेषत: तरुणांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता.
शीव येथील प्रतीक्षा नगर, पवई आणि मालवणी-मालाड येथील म्हाडाच्या घरांसाठी सर्वाधिक अर्ज आले होते. अर्जांचा आकडा घरांच्या कित्येक पटींनी अधिक होता. सोडत सुरु असताना उपस्थित अर्जदारांचा जीव अक्षरश: टांगणीला लागलेला होता.विजेता घोषित झाल्यानंतर टाळ्यांचा गजर होत होता. (प्रतिनिधी)
‘आनंद गगनात मावेनासा’
गोरेगावला म्हाडाचे घर लागले आहे. आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मुंबईत घर असावे, हे स्वप्न होते. ते पूर्ण झाले आहे.
- विजयकुमार लुफा
‘गोरेगावात घर मिळाले’
गोरेगावला घर मिळाले आहे. मुंबईत स्वत:चे घर व्हावे हे स्वप्न होते. म्हाडाच्या सोडतीमुळे घराचे स्वप्न साकार झाले आहे.
- अँंन्थोनी कॉन्टीहो
‘घर मिळाल्याचा आनंद’
मुंबईत भाड्याने राहत होतो. हक्काचे घर झाले आहे. म्हाडाचे घर लागले याचा आनंद असून, पुढील सोडतीसाठी अर्जदारांना शुभेच्छा.
- अंकुर जोहरी
‘मुंबईत घर झाल्याचा आनंद’
सध्या औरंगाबाद येथे राहतो. आता पवईला म्हाडाचे घर लागले आहे. मुळात मुंबईत घर झाले याचाच जास्त आनंद आहे.
- विजय खारकर
‘अतिशय आनंद झाला’
म्हाडाचा कर्मचारी असून, म्हाडाचे घर लागले याचा अधिक आनंद आहे. स्वत:च्या घराचे स्वप्न साकार होणे यापेक्षा दुसरा आनंद नाही.
- उमेश वानखेडे
४६ देशांतील २६ हजार नागरिकांनी पाहिली सोडत
म्हाडाच्या सोडतीचे थेट प्रक्षेपण ४६ देशांतील २६ हजार नागरिकांनी पाहिल्याचा दावा प्राधिकरणाने केला आहे. सकाळी ४० देशांतील २० हजार नागरिक सोडतीचा कार्यक्रम पाहत होते. दुपारी १२च्या सुमारास ४२ देशातील २२ हजार नागरिक हा कार्यक्रम पाहत होते. तर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तब्बल ४६ देशातील २६ नागरिकांनी
म्हाडाच्या सोडतीचा कार्यक्रम संकेतस्थळावर पाहिल्यादा दावा प्राधिकरणाने केला.
विजेत्यांचा
म्हाडाकडून सत्कार
मुंबईतील विविध ठिकाणांवरील घरांची सोडत काढण्यात येत असतानाच विजेत्यांपैकी अँन्थोनी कॉन्टीहो, अंकुर जोहरी, विजय खारकर, उमेश वानखेडे, महेश कोष्टे आणि विजयकुमार लुफ्ता या विजेत्यांना सभागृहाच्या व्यासपीठावर सन्मानपूर्वक बोलावण्यात आले आणि त्यांचा पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कारही करण्यात आला. म्हाडाचे घर लागल्यानंतर यापैकी अनेकांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिल्या; यावेळी विजेत्यांच्या डोळ्यांत आनंदांश्रू तराळले.
अभिनेत्री छाया कदम यांनाही म्हाडाचे घर
मराठी चित्रपट ‘सैराट’मध्ये ‘अक्का’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री छाया कदम हिला शीव प्रतीक्षानगरमध्ये म्हाडाचे घर लागले आहे. ‘परशा’ आणि ‘अर्ची’ पळून हैदराबादला आल्यानंतर त्यांना ‘अक्का’ आपल्या घरात आश्रय देते. ‘सैराट’ मध्ये छायाची छोटीशी भूमिका होती. त्या भूमिकेतही तिने आपला ठसा उमटवला. ‘फॅन्ड्री’ चित्रपटातही तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. ‘भिडू’साठी छायाला दादासाहेब फाळके उत्कृष्ट सहायक अभिनेत्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
हेमांगी कवी, सुहास परांजपे यांनाही घर
अभिनेत्री हेमांगी कवी आणि सुहास परांजपे यांनाही म्हाडाचे घर लागले आहे. हेमांगीने म्हाडाच्या घरासाठी यापूर्वी तब्बल सातवेळा अर्ज केला होता. अखेर आठव्या प्रयत्नात तिला यश मिळाले. हेमांगी सध्या ‘ती फुलराणी’तून छाप उमटवत आहे. सुहास परांजपे एका मालिकेत सासूच्या भूमिकेत असून, त्यामुळे ती चर्चेत आहे.