महाराष्ट्राचं वास्तव: १,२१७ माता अन् १६,००० बालमृत्यू; तरीही लस का नको?
By सोमनाथ खताळ | Published: August 24, 2023 09:43 AM2023-08-24T09:43:28+5:302023-08-24T09:43:53+5:30
आकडा मोठा असून नकार देणाऱ्यांची संख्या चिंता वाढविणारी आहे
सोमनाथ खताळ, लोकमत न्यूज नेटवर्क, बीड: बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. हेच मृत्यू टाळण्यासाठी शासनाने ‘मिशन इंद्रधनुष्य’ या मोहिमेचा पहिला टप्पा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान राबविला. यात राज्यातील २ लाख ७५ हजार बालकांनी आणि ५६ हजार मातांनी लस घेतली. हा आकडा मोठा असला तरी नकार देणाऱ्यांची संख्याही चिंता वाढविणारी आहे. ० ते ५ वयोगटातील ६ हजार ७२६ बालके आणि १८१ गर्भवतींनी लस घेण्यास नकार दिला आहे. यांचे समुपदेशन करूनही आरोग्य विभाग थकला आहे.
२०२२-२३ या वर्षात राज्यात १,२१७ माता आणि १६,८७५ मातांचा मृत्यू झाला होता. तसेच राज्यातील ३७ हजार ५६२ बालके आणि ३ हजार ११० गर्भवती अजूनही लसीकरणापासून दूर पळत असल्याचे समोर आले आहे.
नाही म्हणजे नाहीच....
आरोग्य विभाग नकार देणाऱ्या प्रत्येकाच्या दारी पोहोचला. परंतु त्यांनी दुष्परिणाम, आरोग्य विभाग आणि शासनावरील अविश्वास व बेफिकिरी यामुळे लस देण्यास गेलेल्या आरोग्य विभागाला परतवून लावल्याचे सांगण्यात आले. कितीही समुपदेशन केले तरी त्यांनी नाही म्हणजे नाहीच, अशी भूमिका घेतली आहे.
अशी आहे आकडेवारी
- एकूण लसीकरण सत्र २८,३६१
- ० ते ५ वर्षे लाभार्थी २,३९,८६३
- ० ते ५ वर्षे लसीकरण २,७५,३३५
- गरोदर माता लाभार्थी ४१,८०८
- गरोदर माता लसीकरण ५६,५९२
साडेसहा हजार बालके, १८१ गर्भवतींचा लस घेण्यास नकार
- कारणे बालके गरोदर माता
- घरबंद असणे १०,२७० १,६२४
- आजारी असणे १०,४९८ ४८७
- भीती ४९४ २८
- इतर कारणे ११,९६७ ७३५
कधी द्यावी लस?
मुलांना जन्मतः हिपेटायटिस बी, बीसीजी, दीड, अडीच व साडेतीन महिन्याला ओपीव्ही रोटा व पेन्टा, दीड, साडेतीन व नऊ महिन्याला आयपीव्ही व पीसीव्ही, नऊ महिन्याला व दीड वर्षाला एमआर जेई व अ जीवनसत्त्व, दीड वर्षाला ओपीव्ही व डीपीटी, पाच वर्षाला डीपीटी, दहा व सोळाव्या वर्षाला टीडी अशा लस दिल्या जातात.