व्यवस्थेविरोधात ‘ब्र’ काढणाऱ्या बंडखोर लेखिका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 09:51 PM2018-09-27T21:51:53+5:302018-09-27T21:58:24+5:30
कविता महाजन हे नाव उच्चारल्यानंतर डोळ्यासमोर येतात त्या त्यांच्या बंडखोर लेखणीमधून उतरलेल्या ब्र आणि भिन्न अशा दोन कादंब-या.
पुुणे : कविता महाजन हे नाव उच्चारल्यानंतर डोळ्यासमोर येतात त्या त्यांच्या बंडखोर लेखणीमधून उतरलेल्या ब्र आणि भिन्न अशा दोन कादंब-या. एका लेखकाच्या नव्हे तर कार्यकर्त्याच्या भूमिकेमधून त्यांचा संपूर्ण लेखनप्रवास सुरू होता. संशोधनवृत्ती हा त्यांचा लेखनाचा गाभा होता.
आदिवासी भागातल्या अनुभवांचा इतिवृत्तांत, त्यासोबत स्वयंसेवी संस्थांमधल्यासह स्त्री-पुरुष संबंधांमधलं राजकारणदेखील त्यांनी ब्र मध्ये हळूवारपणे उलगडलं.ब्र नंतर भिन्न कादंबरीही एका सामाजिक उत्तरदायित्वाच्या जाणिवेतूनच त्यांनी जगासमोर आणली. एचआयव्ही पॉझिटिव्ह म्हणून जन्माला आलेली मुले, त्यांना जन्म देऊन तरुण वयात मृत्युमुखी पडलेल्या मुली, त्यांच्या यातना हे सगळं जग, छळ, फसवणूक, नात्यांवरचा, माणसांवरचा उडवणारा विश्वास त्यांनी जवळून अनुभवला होता. टाटा समाजविज्ञान संस्थेसाठी विदर्भातल्या आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवांची सद्यस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी एक अभ्यासदौराही त्यांनी केला. जवळपास आठ महिने विदर्भात राहून त्यांनी मृत्यू, ताण, आत्महत्या झालेल्या त्या घरातल्या लहान वयाच्या मुलांच्या मनावर झालेला विपरित परिणाम पाहिला.
या दोन कादंब-यांमुळे त्या चर्चेत आल्या असल्या तरी त्यांच्या लेखनाची बीज ही कवितांपासून रूजली. तत्पुरुष, धुळीचा आवाज यासारख्या कवितासंग्रहांतल्या कविताच्या कविता अनुष्टुभ,, कवितारती मिळून सा-याजणीसारख्या प्रथितयश नियतकालिकांतून प्रसिद्ध होत होत्या. या कविता वाचून ना.धों.महानोर, इंदिरा संत, शंकर-सरोजिनी वैद्य, प्रभा गणोरकर अशा अनेक दिग्गजांची त्यांना दादही मिळाली होती. त्यांच्या धारदार लेखणीतून कागदावर उतरलेल्या कवितांमुळे स्त्रीवादाचा ठपका त्यांच्यावर बसला खरा; मात्र त्यांच्या कवितांमध्ये एका संवेदनशील आणि तरल मनाचे दर्शनही नकळतपणे घडले. वारली लोकगीताचं संपादन, भारतीय लेखिका हा देशभरातील लेखिकांचे प्रतिबिंब दाखविणारा ग्रंथ हे त्यांच्या वैविध्यपूर्ण पैलूचेच दर्शन घडवितात. एक बंडखोर लेखिका अशी त्यांची ओळ्ख असली तरी लहान मुलांसाठी त्यांनी केलेले लेखन हे त्यांच्या एका मातृत्वाचे पैलू उलगडून दाखविते. चित्रं, कॅलिग्राफी, फोटोग्राफी, अ?ॅनिमेशन, संगीत अशी विविध माध्यमांचा वापर करून त्यांनी लिहिलेली कुहु ही मल्टिमिडीया कादंबरी हा भारतीय साहित्य विश्वातील आगळावेगळा प्रयोग ठरला. बकरीचं पिल्लू: जंगल गोष्टी पाच पुस्तकांचा संग्रह, जोयानाचे रंग बालसाहित्य त्यांनी लहानमुलांसाठी लिहिले. मराठवाडयातील नांदेडसारख्या छोट्याशा गावातील प्रतिभा निकेतन माध्यमिक शाळेमध्ये त्यांचे शिक्षण झाले. त्यानंतरच्या नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यलायात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. मराठी साहित्यात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. एका छोट्याशा शहरातून मुंबईसारख्या मोठ्या शहरात त्यांनी स्वत:ची लेखनाच्या कक्षा अधिकच रूंदावत नेल्या. या लेखनकारर्किर्दीमध्ये त्या अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरल्या. रजई या इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या अनुवादाला साहित्य अकादमीचा भाषांतरसाठीचा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाडमय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार, कवयित्री बहिणाबाई पुरस्कार याच्या मानकरी त्या ठरल्या आहेत.