बंडखोरीचा बॉम्ब !
By admin | Published: September 28, 2014 01:07 AM2014-09-28T01:07:07+5:302014-09-28T01:07:07+5:30
युती व आघाडीत फूट पडली आणि चारही प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारांची पळवापळवी झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेवर बंडखोरीचा बॉम्ब पडला. भाजप नेत्यांनी घेतलेल्या सावध भूमिकेमुळे नाराजी
दीनानाथ पडोळे, अमोल देशमुख राष्ट्रवादीत
नागपूर : युती व आघाडीत फूट पडली आणि चारही प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारांची पळवापळवी झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेवर बंडखोरीचा बॉम्ब पडला. भाजप नेत्यांनी घेतलेल्या सावध भूमिकेमुळे नाराजी नंतरही बंडखोरी झाली नाही. दिवसभर बंडखोरीची चर्चा राजकीय वर्तुळासह मतदारांमध्येही रंगली होती.
सर्वाधिक बंडखोरी दक्षिण नागपुरात झाली. आमदार दीनानाथ पडोळे यांचे काँग्रेसचे तिकीट कटल्यानंतर त्यांनी दक्षिण नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्ज दाखल केला. पडोळेंनी ‘घड्याळ’ बांधल्यामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक राजू नागुलवार व नगरसेविका सीमा राऊत नाराज झाले. नागुलवार यांच्यासह सीमा राऊत यांचे पती सुनील यांनीही बंडखोरी करीत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. शिवसेनेने किरण पांडव यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेले जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे यांनी देखील बंड पुकारले. त्यांनीही अर्ज दाखल केला. २००४ मध्ये सावरबांधे यांनी शिवसेनेच्या तिकिटावर पूर्व नागपुरातून ८५ हजारावर मते घेतली होती. २००९ मध्ये दक्षिणमध्ये त्यांचे तिकीट कटले होते. यावेळीही त्यांनी संधी हुकली. त्यामुळे नाराजीतून त्यांनी असा निर्णय घेतला. युतीमध्ये दक्षिणची जागा शिवसेनेकडे होती. त्यावेळीच या जागेवर भाजपसह शिवसंग्रामने दावा केला होता. युती तुटल्यांतर ही जागा शिवसंग्रामकडून प्रमोद मानमोडे यांना मिळावी, यासाठी बरेच प्रयत्न झाले. पण शेवटी भाजपचे नगरसेवक सुधाकर कोहळे यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे नाराज झालेले मानमोडे यांनीही बंड पुकारत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष आभा पांडे यांनीही बंडखोरी करीत मध्य नागपुरातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला.
कामठीत ऐनवेळी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांचे नाव जाहीर झाले. त्यामुळे या तिकीटावर दावा करणारे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांनीही अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली. रामटेकमध्येही तगड्या उमेदवारांनी पक्षांतर करीत बंडखोरी केली. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे पुत्र डॉ. अमोल देशमुख यांनी काँग्रेसकडे रामटेकची उमेदवारी मागितली होती. मात्र, पक्षाने गेल्यावेळी पराभूत झालेले माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांना पुन्हा संधी दिली.
त्यामुळे नाराज झालेले डॉ. अमोल यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीकडून अर्ज भरला. राष्ट्रवादीचे पदाधिकारी असलेले डी. मल्लिकार्जुन रेड्डी हे भाजपचे उमेदवार झाले. रेड्डी हे गेल्यावेळी अपक्ष उमेदवार म्हणून रामटेकच्या रिंगणात उतरले होते. (प्रतिनिधी)
भाजपनिष्ठ तोतवानींची दक्षिण-पश्चिममध्ये बंडखोरी
भाजपच्या दक्षिण- पश्चिम मंडळाचे उपाध्यक्ष पंजू तोतवानी यांनी ऐनवेळी बंडखोरी केली. त्यांनी दक्षिण- पश्चिम नागपुरात शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. रणजित देशमुख व अनिल देशमुख हे सख्खे चुलत भाऊ आहेत. विशेष म्हणजे भाजपचे आ. देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज भरताना तोतवानी हे त्यांच्या सोबत होते. रॅलीतही सहभागी झाले होते. आज अचानक त्यांनी शिवसेनेचे ‘धनुष्य’ हाती घेतले. तोतवानींच्या या बंडखोरीची भाजपमध्ये दिवसभर चर्चा सुरू होती.