पाली प्रवेशद्वारावरील कमान पुन्हा बांधा
By admin | Published: October 8, 2016 02:20 AM2016-10-08T02:20:29+5:302016-10-08T02:20:29+5:30
अनेक गावांमध्ये ही सीमा दर्शविण्यासाठी व शोभा वाढविण्यासाठी उंच आणि भव्य प्रवेशद्वार तयार केले जाते.
पाली : प्रत्येक गावाची एक सीमारेषा ठरलेली असते. अनेक गावांमध्ये ही सीमा दर्शविण्यासाठी व शोभा वाढविण्यासाठी उंच आणि भव्य प्रवेशद्वार तयार केले जाते. पाली गावच्या सीमेवर देखील अशाच प्रकारची भव्य दगडी कमान पाच दशकांपूर्वी उभारण्यात आली होती. परंतु आता फक्त त्याचे भग्न अवशेषच शिल्लक राहिले आहेत. तेव्हा ही कमान पुन्हा बांधण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
बल्लाळेश्वराचे स्थान म्हणून पाली गाव सर्वत्र प्रसिद्ध आहे. या गावच्या सीमेवर पाली-खोपोली रस्त्यावर उंबरवाडीनजीक १९६५-६७ मध्ये रायगड जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष दादासाहेब लिमये यांनी पुढाकार घेऊन प्रवेशव्दारावर भव्य दगडी नक्षीकाम के लेली कमान उभारली होते. त्यानंतर कित्येक वर्षे ही कमान पालीची शान राखत रु बाबात उभी होती. परंतु नागोठणे येथे जेव्हा आयपीसीएल (सध्याची रिलायन्स) कंपनीची उभारणी सुरू झाली तेव्हा यासाठी लागणारी साधने, यंत्रे ही मुंबई-पुणे मार्गे पालीवरून नेण्यात येऊ लागली.
परिणामी या अजस्त्र वाहनांस या कमानीखालून जाता येत नव्हते. त्यामुळे नाइलाजास्तव ही कमान तोडावी लागली. सध्या याच्या उरलेल्या भागावर झाडे उगवली आहेत. त्यामुळे पालीच्या शिरपेचातील एक मोती निखळला. त्यानंतर ही कमान पुन्हा उभी करण्याचे स्वारस्य कोणीच दाखविले नाही. परिणामी आज ही कमान भग्नावस्थेत तशीच उभी आहे. ही कमान पुन्हा उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)
>शिक्षणमहर्षी दादासाहेब लिमये १९६५-६७ ला जिल्हा परिषद अध्यक्ष असताना शासकीय खर्चाने ही कमान उभारण्यात आली होती. पाली हे अष्टविनायक क्षेत्र आहे. रोज असंख्य भाविक येथे येत असतात. इतर गावांमध्ये जसे प्रवेशद्वार त्या गावची शोभा वाढवित असते, त्याचप्रमाणे पाली गावासाठी पुन्हा भव्य प्रवेशद्वार उभारण्यात यावे.
- रवींद्रनाथ ओव्हाळ,
सामाजिक कार्यकर्ते, पाली