‘रासप’ उपाध्यक्षांच्या घरावर प्राप्तीकरचा छापा
By admin | Published: December 17, 2015 12:38 AM2015-12-17T00:38:33+5:302015-12-17T00:38:33+5:30
राष्ट्रीय समाज पक्षाचे उपाध्यक्ष डॉ़ रत्नाकर गुट्टे यांचा परळीतील बंगला व गंगाखेडमधील साखर कारखान्यावर बुधवारी औरंगाबादच्या प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले.
परळी/गंगाखेड : राष्ट्रीय समाज पक्षाचे उपाध्यक्ष डॉ़ रत्नाकर गुट्टे यांचा परळीतील बंगला व गंगाखेडमधील साखर कारखान्यावर बुधवारी औरंगाबादच्या प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले. गुट्टे यांच्याबरोबरच त्यांचे जावई व राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड यांच्या कन्हेरवाडी येथील घरावरही प्राप्तीकर विभागाने छापा टाकला.
बुधवारी सकाळी ८़३० ते ९ वाजण्याच्या सुमारास औरंगाबादचे चार अधिकारी, दोन कर्मचारी, एक फौजदार व पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील माखणी येथील कारखान्याच्या कार्यालयात आले. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. तपासणीत नेमके काय आढळले, याची माहिती मिळू शकली नाही़
‘गंगाखेड शुगर’चे जनसंपर्क अधिकारी हनुमंत लटपटे म्हणाले की, प्राप्तीकर विभागाकडून वार्षिक तपासणी केली जात आहे.
बीड जिल्ह्यातील कन्हेरवाडी येथीलफड यांच्या घरी सकाळी सहा वाजल्यापासून अधिकाऱ्यांनी पाहणी केली. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये फड यांनी ग्रामपंचायत सदस्यांना सरपंच निवडीच्या वेळी हेलिकॉप्टरने मतदानासाठी कन्हेरवाडी येथे आणले होते. त्यावरून ते चर्चेत आले होते. दरम्यान,गुट्टे यांच्या नातेवाईकांच्याही घरावर छापे टाकल्याचे समजते. (लोकमत न्यूज नेटवर्क)