दोन कोटींची लाच घेणारा प्राप्तिकर आयुक्त अटकेत
By admin | Published: May 4, 2017 05:15 AM2017-05-04T05:15:52+5:302017-05-04T05:15:52+5:30
रुईया कुटुंबाच्या मालकीच्या एस्सार उद्योगसमूहातील एका कंपनीशी संबंधित अपिलावर अनुकूल निकाल देण्यासाठी लाच
मुंबई : रुईया कुटुंबाच्या मालकीच्या एस्सार उद्योगसमूहातील एका कंपनीशी संबंधित अपिलावर अनुकूल निकाल देण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपावरून, केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) प्राप्तिकर विभागाचे मुंबईतील एक आयुक्त बी. बी. राजेंद्र प्रसाद व एस्सार समूहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप मित्तल यांच्यासह एकूण सहा जणांना अटक केली.
‘सीबीआय’च्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने मुंबई आणि विशाखापट्टणम येथे धाडी घालून केलेल्या कारवाईने उद्योगविश्वात व प्राप्तिकर खात्यातही मोठी खळबळ उडाली. अलीकडच्या काळात प्राप्तिकर आयुक्त दर्जाचा अधिकारी लाच घेताना
रंगेहाथ पकडला जाण्याची ही पहिलीच घटना आहे.
बी. बी. राजेंद्र प्रसाद भारतीय महसुली सेवेचा (आयआरएस) १९९२ च्या तुकडीतील अधिकारी असून, सध्या तो मुंबईत प्राप्तिकर आयुक्त (अपिल-३०) या पदावर होता. अटक केल्या गेलेल्या इतरांमध्ये एस्सार उद्योगसमूहाचा ‘एमडी’ प्रदीप मित्तल, त्याच समूहातील एका कंपनीचा मुंबईतील एक लेखाअधिकारी विपिन बाजपई, मे. जी. के. चोकसी या फर्मचा एक चार्टर्ड अकाउंटन्ट श्रेयस पारिख , बांधकाम व्यावसायिक सुरेश कुमार जैन आणि त्याचा एक नातेवाईक मनीष जैन यांचा समावेश आहे. आरोपींकडून दीड कोटी रुपयांची रोकडही हस्तगत केली गेली. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एस्सार स्टील्स विशाखापट्टणम कॉर्पोरेशनशी संबंधित बालाजी ट्रस्टच्या एका अपिलाची सुनावणी प्राप्तिकर आयुक्त प्रसाद यांच्यापुढे होती. त्यात ट्रस्टच्या बाजूने निकाल देण्यासाठी प्रसाद याने दोन कोटी रुपयांची मागणी केली. ही रक्कम ट्रस्टने मनीष जैन याच्याकडे द्यावी व त्याने ती विशाखापट्टणम येथे सुरेश कुमार जैन यांच्याकडे पोहोचावावी, असे ठरले होते.
सीबीआयच्या सूत्रांनुसार, मुंबईत महालक्ष्मी येथे सरकारी निवासस्थानात राहणारा प्रसाद हाही मूळचा विशाखापट्टणचा आहे. अपिलाचा अनुकूल निकाल दिल्यानंतर, तो मुद्दाम सुट्टी घेऊन विशाखापट्टणम येथे गेला व त्याने सुरेश कुमार जैन याच्याकडे लाचेच्या रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून १९.३४ लाख रुपयांची मागणी केली. सीबीआयला याचा सुगावा लागल्यावर सापळा रचला गेला व सुरेश कुमार जैनकडून पैसे घेताना प्रसादला रंगेहाथ पकडले गेले.
प्रसाद याला लाच देण्यासाठी मुंबईहून पाठविलेली १.५० कोटी रुपयांची उरलेली रक्कमही जैन याच्याकडून हस्तगत केली गेली. सर्व आरोपींच्या मुंबई व विशाखापट्टणम येथील कार्यालयांवर व निवासस्थानांवर धाडीही घालण्यात आल्या. त्यात स्थावर मालमत्तांमध्ये केलेल्या गुंतवणुकीची कागदपत्रे, बँक खात्यांचे तपशील, गुन्ह्याशी संबंधित अन्य दस्तावेज व दोन बँक लॉकरही मिळाले. या अपिलाच्या कामात सीए म्हणून श्रेयस पारेख याने काम पाहिले होते, असे सांगण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)
ट्रस्टच्या बाजूने निकाल देण्यास मागितले २ कोटी
एस्सार स्टील्स विशाखापट्टणम कॉर्पोरेशनशी संबंधित बालाजी ट्रस्टच्या एका अपिलाची सुनावणी प्राप्तिकर आयुक्त प्रसाद यांच्यापुढे होती. त्यात ट्रस्टच्या बाजूने निकाल देण्यासाठी प्रसाद याने दोन कोटी रुपयांची मागणी केली.