बरसल्या शास्त्रीय नृत्य गायनाच्या स्वरधारा
By admin | Published: June 30, 2014 12:45 AM2014-06-30T00:45:15+5:302014-06-30T00:45:15+5:30
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे अभिजात शास्त्रीय संगीताच्या गायन व कथ्थक नृत्याच्या अनोख्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले. आषाढ महिन्याच्या प्रारंभी अपेक्षित पाऊसधारा न कोसळल्याने
शास्त्रीय मैफिल : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे आयोजन
नागपूर : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे अभिजात शास्त्रीय संगीताच्या गायन व कथ्थक नृत्याच्या अनोख्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले. आषाढ महिन्याच्या प्रारंभी अपेक्षित पाऊसधारा न कोसळल्याने काहीशा रुक्ष अशा वातावरणाला गारवा प्रदान करणारी ही मैफिल होती. हा कार्यक्रम सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे पार पडला. सुप्रसिद्ध गायिका शरबानी चक्रवर्ती यांचे शास्त्रीय गायन आणि त्यानंतर प्रतिभावंत कथ्थक नृत्यांगना नेहा बॅनर्जी व पल्लवी शोम यांच्या नृत्याने हा कार्यक्रम रंगला. विख्यात कथ्थक नृत्य गुरु माँ रेवा विद्यार्थी यांना त्यांच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरणाने आदरांजली अर्पण केली. शरबानी चक्रवर्ती या शास्त्रीय संगीतातील परिचित गायिका आहे. गाजदार आवाज, सुरेल व कसदार गायन वैशिष्ट्य असलेल्या या गायिकेने गुरु पं. अजेय सेन चौधरी, विश्वजीत चक्रवर्ती, मधुसूदन ताह्मणकर, डॉ. मंदा पत्तरकिने व आरती अंकलीकर- टिकेकर यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले आहे. सीमित वेळात राग पुरिया धनश्रीसह संत मीराबाईचे भजन ‘मतवारो बादर आयो हरि का संदेशा कछु नाही लायो..’ तयारीने सादर करून त्यांनी आपल्या गान प्रतिभेचा परिचय रसिकांना दिला. त्यांना तबल्यावर विवेक मिश्र तर संवादिनीवर सोमनाथ मिश्र यांनी साथसंगत केली. यानंतर नेहा बॅनर्जी आणि पल्लवी शोम यांच्या नादमय कथ्थक नृत्याने रसिकांचा ताबा घेतला. या नृत्यांगनांनी सुबक हावभावांचे, लयकारीच्या आवर्तनात भिजलेल्या घुंगरांचे, भिंगरीच्या गतीने फिरणारे कलात्मक सादरीकरणाने उपस्थितांना आनंद दिला. पल्लवी ही विख्यात गुरु रेवा विद्यार्थी यांची तर नेहा पं. बिरजू महाराज यांची शिष्य आहे. नृत्यदेवता नटराजाला वंदन करून त्यांनी शिवस्तुती सादर केली. आकर्षक आणि वेधक नृत्यसौष्ठव, सकस देहबोली आणि परस्पर सामंजस्य यासह नृत्याची ही आनंदपर्वणी होती. ताल त्रितालात कथ्थकचे आमद, तोडे, तुकडे, परण, फर्माईशी, चक्रदार यासह नृत्याची ही जुगलबंदी उपस्थितांना दाद द्यायला भाग पाडणारी होती. फ्युजनने या नृत्याची रंगत अधिक वाढली. त्यांना सोमनाथ मिश्र, विवेक मिश्र, अतुल शंकर-बासरी, प्रसाद शहाणे यांनी सतारीवर अनुरुप संगत केली. त्यांनी राग चारुकेशीच्या सादरीकरणाने आपल्या वादन प्रतिभेचा परिचय दिला. निवेदन श्वेता शेलगावकर यांचे होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. जे. एम. चंद्राणी, कवी कृष्णकुमार चौबे, ज्येष्ठ व्हायोलिनवादक व पल्लवीचे पिता प्रताप पवार, विख्यात नाट्य कलावंत गुरु रेवा विद्यार्थी यांचा पुत्र आशिष विद्यार्थी, प्रा. उत्सवी बॅनर्जी प्रामुख्याने उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)