अपुऱ्या मनुष्यबळातच होणार रिकॅलिब्रेशन
By Admin | Published: May 18, 2015 04:19 AM2015-05-18T04:19:56+5:302015-05-18T04:19:56+5:30
एमएमआरटीएकडून ((मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण) रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यात १ जूनपासून एक रुपया वाढ करण्यात आली
मुंबई : एमएमआरटीएकडून ((मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण) रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यात १ जूनपासून एक रुपया वाढ करण्यात आली. ही वाढ करण्यात आली असली तरी मीटरचे रिकॅलिब्रेशन (मीटरमध्ये नवीन भाड्यासाठी बदल-अंश परीक्षण) केल्याशिवाय नवीन भाडेवाढ रिक्षा-टॅक्सीचालक आकारू शकत नाहीत.
एमएमआरटीएचे क्षेत्र, रिक्षा-टॅक्सींची संख्या आणि १ जूनपासून केले जाणारे हे रिकॅलिब्रेशन पाहता आरटीओकडे त्या कामासाठी मनुष्यबळ कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळात काम करणार तरी कसे, असा सवाल उपस्थित होत आहे. एमएमआरडीए क्षेत्रात जवळपास साडेतीन लाख रिक्षा-टॅक्सी आहेत. नवीन भाडे १ जूनपासून लागू होणार असल्याने इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये बदल करणे आवश्यक आहे. मीटरचे रिकॅलिब्रेशन जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत चालक नवीन भाडेवाढ लागू करू शकत नसल्याचे आरटीओकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मात्र आरटीओकडे सध्या अपुरे मनुष्यबळ असल्याने सध्याच्या कर्मचाऱ्यांवर रिकॅलिब्रेशनचा मोठा ताण पडणार असल्याचे सांगण्यात येते. (प्रतिनिधी)