अॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीला मान्यता
By admin | Published: December 11, 2015 02:28 AM2015-12-11T02:28:17+5:302015-12-11T02:28:17+5:30
अॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीला गुरुवारी विधिमंडळात एकमताने मान्यता मिळाली. त्यामुळे आता अॅक्युपंक्चर तज्ज्ञांना या चिकित्सा पद्धतीचा व्यावसायिक (प्रॅक्टिस) वापर करता येणार आहे.
नागपूर : अॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीला गुरुवारी विधिमंडळात एकमताने मान्यता मिळाली. त्यामुळे आता अॅक्युपंक्चर तज्ज्ञांना या चिकित्सा पद्धतीचा व्यावसायिक (प्रॅक्टिस) वापर करता येणार आहे.
अॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीचे विधेयक वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभा आणि विधान परिषदेत मांडले. ते दोन्ही सभागृहांत एकमताने मंजूर केले.
अॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धती ही महाराष्ट्रातील एक लोकप्रिय चिकित्सा पद्धत आहे. या चिकित्सा पद्धतीला तिच्या विकासासाठी योग्य ती संधी निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच या चिकित्सा पद्धतीचे अध्यापन व व्यवसाय यांचे विनियमन करणे आवश्यक आहे. यादृष्टीने महाराष्ट्रात ही पद्धती लागू करण्यात आल्याची प्रक्रिया सुरू करत आहोत, असे विनोद तावडे यांनी सांगितले. अॅक्युपंक्चर ही शरीरावरील विशिष्ट बिंदूवर त्वचेमध्ये बारीक बारीक सुया टोचून त्याद्वारे वेदनामुक्त करणारी किंवा आजारपण बरी करणारी एक चिकित्सा पद्धत आहे. ही एक महत्त्वाची प्राकृतिक स्वरूपाची चिनी पारंपरिक चिकित्सा पद्धती आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार अॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीच्या वापरास सुमारे २५०० हून अधिक वर्षांपूर्वी सुरुवात झाली असावी. या चिकित्सा पद्धतीची संकल्पना ही अतिप्राचीन काळी विकसित झाली असावी, असे अनुमान चिनी प्रमाणावरून काढता येते, असे विनोद तावडे यांनी सांगितले.
अॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीच्या विधेयकाची माहिती देताना तावडे यांनी सांगितले की, आशियामधील शेजारील राष्ट्रांना अॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीची ओळख सहाव्या शतकात झाली व तेथे ही पद्धत तत्परतेने स्वीकारली गेली. १६ व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत ही पद्धत युरोपपर्यंत पोहोचली. गेल्या दोन दशकांमध्ये अॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धती ही संपूर्ण जगभरात पसरली असून त्यामुळे या चिकित्सा पद्धतीच्या विकासाला चालना मिळाली आहे, असेही तावडे यांनी नमूद केले.