विद्यापीठातील शिक्षक पदभरतीस मान्यता : उच्च शिक्षण विभागाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 01:26 PM2019-08-08T13:26:09+5:302019-08-08T13:27:00+5:30
पुढील सहा महिन्यांच्या आत रिक्त पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करावी...
पुणे : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेऊन राज्यातील अकृषी विद्यापीठातील रिक्त असलेल्या शिक्षकीय व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्यातील १५ विद्यापीठांमधील ६५९ शिक्षकांच्या रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे मुंबई विद्यापीठातील सर्वाधिक १३६ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील १११ पदे भरली जाणार आहेत.
राज्याच्या वित्त विभागाने आकृतीबंध अंतिम मंजूर होईपर्यंत नवीन पदनिर्मितीस तसेच पदभरती करण्यास निर्बंध घातले होते. मात्र, २०१७ पासून नवीन पदभरतीवर निर्बंध असल्याने या काळात सेवानिवृत्ती व इतर कारणास्तव रिक्त झालेली पदे भरता आली नाहीत. त्यामुळे राज्य शासनाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेवून १५ अकृषी व अभिमत विद्यापीठांसाठी मंजूर पदांच्या ८० टक्के इतक्या मर्यादेत पदभरती करण्यास मान्यता दिली आहे.
विद्यापीठांनी रिक्त पदांची भरती करताना ज्या शैक्षणिक विभागातील पदे भरण्याची आवश्यकता आहे, त्याच शैक्षणिक विभागांची पदे भरण्यास प्राधान्य द्यावे. विद्यापीठांनी जास्तीत जास्त सहायक प्राध्यापकांची पदे भरावीत. तसेच पुढील सहा महिन्यांच्या आत रिक्त पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण विभागाने अध्यादेश प्रसिद्ध करून दिले आहेत.
........
पदभरती करण्यास मान्यता मिळालेल्या पदांची विद्यापीठनिहाय संख्या
मुंबई विद्यापीठ - १३६, एसएनडीटी महाविद्यापीठ, मुंबई- ७८, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक - १२, राष्ट्रसंत तुकडोजीमहाराज नागपूर विद्यापीठ - ९२, गोंडवाना विद्यापीठ ,गडचिरोली -११, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ-०७ , शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर ७२, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ -१११, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद -७३, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव -०६, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड-२१, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती-१३, डेक्कन अभिमत विद्यापीठ, पुणे- १४, टिळक महाराष्ट्र अभिमत विद्यापीठ, पुणे-०५, गोखले अभिमत विद्यापीठ, पुणे ०८.