नक्षल भागात हेलिकॉप्टर, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 04:19 AM2017-09-08T04:19:12+5:302017-09-08T04:19:27+5:30
गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील नक्षलविरोधी अभियानांतर्गत पोलीस दलाच्या वापरासाठी आणि हवाई वैद्यकीय अॅम्ब्युलन्स म्हणून उपयोगासाठी नवे हेलिकॉप्टर विकत घेण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील नक्षलविरोधी अभियानांतर्गत पोलीस दलाच्या वापरासाठी आणि हवाई वैद्यकीय अॅम्ब्युलन्स म्हणून उपयोगासाठी नवे हेलिकॉप्टर विकत घेण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. तसेच, शासनाच्या वापरासाठीही दुसरे नवीन हेलिकॉप्टर घेण्यात येणार आहे.
नक्षलग्रस्त भागासाठी सध्या भाड्याचे हेलिकॉप्टर वापरण्यात येते. त्याचा शासकीय तिजोरीवर पडणारा भार लक्षात घेता नवीन हेलिकॉप्टरची खरेदी फायदेशीर ठरत असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे.
याशिवाय राज्य शासनाच्या मालकीचे हेलिकॉप्टर सिर्कोस्की एस ७६ सी ++ व्हीटी-सीएमएम याचा अलीकडे मुख्यमंत्र्यांच्या दौºयादरम्यान अपघात झाला. त्याचा पुनर्वापर शक्य नसल्याने त्याच्याऐवजी नवीन हेलिकॉप्टरची खरेदी करण्यात येणार आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरच्या अपघात विम्याची रक्कम मिळाल्यानंतर त्यातून हे नवीन हेलिकॉप्टर खरेदी करण्यात येणार आहे. पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील अतिविशेषकृत आणि विशेषकृत विभागातील सरळसेवेने भरावयाची सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक ही पदे भरण्यासही मान्यता देण्यात आली़
ते हेलिकॉप्टर संस्थेस-
राज्य शासनाने एप्रिल २००१मध्ये खरेदी केलेल्या डॉफिन एएस ३६५ एन ३ व्हीटी-एमजीके हे हेलिकॉप्टर फ्रान्समधील युरोकॉप्टर कंपनीकडून २३ कोटी रुपयांना खरेदी केले होते. आता बंद अवस्थेत असलेले हे हेलिकॉप्टर आता राज्यातील शैक्षणिक संस्थेला अभ्यास वा त्या स्वरूपाच्या प्रयोजनासाठी विनामूल्य देण्यात येणार आहे.