मदतीला धावणारे समस्यांच्या विळख्यात

By admin | Published: April 8, 2017 01:28 AM2017-04-08T01:28:55+5:302017-04-08T01:28:55+5:30

विजेच्या तारेत पक्षी अडकला, इतकेच काय पण घरात साप जरी दिसला तर सर्वांत आधी हाक दिली जाते, ती अग्निशामक दलाला

Recognizing Problems That Help | मदतीला धावणारे समस्यांच्या विळख्यात

मदतीला धावणारे समस्यांच्या विळख्यात

Next

धनकवडी : शहरात कुठे आग लागली, इमारत कोसळली, लिफ्टमध्ये कुणी अडकले, विजेच्या तारेत पक्षी अडकला, इतकेच काय पण घरात साप जरी दिसला तर सर्वांत आधी हाक दिली जाते, ती अग्निशामक दलाला. पर्यायाने अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांना. एक कॉल आला की नागरिकांच्या मदतीला तत्परतेने धावणाऱ्या या कर्मचाऱ्यांना मात्र अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव आहे. ८ एप्रिल हा अग्निशामक दिन. अग्निशामक दलाचा स्थापन दिन आणि सुरक्षा सप्ताहानिमित्त घेतलेल्या आढाव्यात हे चित्र दिसून आले आहे. अग्निशामक दलाच्या एका केंद्रावर महिन्यातून सरासरी ३० कॉल येतात. कॉल आला की दलातील कर्मचारी आहे त्या साधनांसह मदतीसाठी धावतात. मात्र, अग्निशामक केंद्राच्या आवारात कर्मचाऱ्यांना राहण्याची सोय नाही, आवश्यक असणारे बूट, ड्रेसची अवस्था म्हणावी तितकी चांगली नाही. आपत्ती व्यवस्थापनामध्ये नवनवीन साधने असताना, अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना अद्यापही पारंपरिक साधनांवरच अवलंबून राहावे लागत आहे.
कात्रज अग्निशामक केंद्रामध्ये एका अधिकाऱ्यासह २५ जवान, एक वाहन आणि प्राथमिक स्तरावर काम करण्याइतपत साधनसामुग्री उपलब्ध आहे. जादा साहित्याची आवश्यकता भासल्यास मुख्यालयातून मदत मागवावी लागते.
येथील कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी संकुल नाही. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न परिसरातील वातावरणामुळे गंभीर झाला आहे. याच परिसरात असणारे कचरा संकलन केंद्र व तीन बायोगॅस प्रकल्प यामुळे होणारे प्रदूषण, दुर्गंधी,
डास यामुळे जवान त्रासले आहेत. अनेक वेळा पत्रव्यवहार केला तरी याची कुणी दखल घेतली नसल्याचे कर्मचाऱ्यांचे दु:ख आहे.
>शहराच्या नकाशाची आवश्यकता
अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांची अडचण होते ती झोपडपट्टी परिसरात. झोपडपट्टी परिसरात आग लागली किंवा एखादी दुर्घटना घडली तर तिथपर्यंत तत्काळ पोहोचणे कर्मचाऱ्यांना शक्य होत नाही.
दुर्घटनेच्या ठिकाणी तत्परतेने पोहोचण्यास आणखी एक समस्या असते, ती वाहतूककोंडीची. कोंडीतून रस्ता काढणे मोठे जिकिरीचे असते. अग्निशामक विभागाकडे शहराचा नकाशा नसल्याने दुर्घटना घडली, त्या ठिकाणी तत्परतेने पोहोचणे शक्य होत नाही.
आगीत सापडलेल्या किंवा बुडत असलेल्या व्यक्तीला वाचविण्यासाठी जवान स्वत:च्या जिवाची पर्वा करीत नाही. अशा बहाद्दर जवानांच्या समस्या सोडविण्यात, चांगले काम केल्यानंतर प्रशासनाकडून कौतुकाची थाप दिली जात नसल्याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

Web Title: Recognizing Problems That Help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.