चिक्की कंत्राटासाठी खडसेंची शिफारस

By admin | Published: August 7, 2015 01:46 AM2015-08-07T01:46:12+5:302015-08-07T01:46:12+5:30

सूर्यकांता या चिक्की उत्पादक कंपनीलाच कंत्राट देण्याचे आदेश आपण कधीही दिले नव्हते. उलटपक्षी तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी

Recommendations for Chikki contract | चिक्की कंत्राटासाठी खडसेंची शिफारस

चिक्की कंत्राटासाठी खडसेंची शिफारस

Next

मुंबई : सूर्यकांता या चिक्की उत्पादक कंपनीलाच कंत्राट देण्याचे आदेश आपण कधीही दिले नव्हते. उलटपक्षी तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी सूर्यकांताला चिक्की वाटपाचे कंत्राट देण्याकरिता शिफारस केली होती, असा आरोप माजी मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
महिला व बालविकास विभागाने सूर्यकांता या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिक्की उत्पादन करणाऱ्या कंपनीला कंत्राट दिल्यावरून गेले काही दिवस वादंग सुरू आहेत. याबाबतच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणे उद्योगमंत्री असताना त्यांनी सूर्यकांताकडूनच चिक्की खरेदी करण्याचे आदेश दिल्याचा आरोप विधान परिषदेत केला होता. याकडे राणे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, उद्योगमंत्री या नात्याने चिक्की खरेदीचा दर ठरवण्यापुरता आपला संबंध होता. आपण तसे आदेश दिले असतील तर मुख्यमंत्र्यांनी त्याचा पुरावा द्यावा. याचा अर्थ माझे आदेश विद्यमान सरकारकडूनही पाळले जातात, असा होईल. मी मंत्री असताना कधीच कुठलेही कंत्राट विशिष्ट कंपनीला अथवा व्यक्तीला देण्याचा आग्रह धरलेला नाही. मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत. उलटपक्षी सूर्यकांताला चिक्कीचे कंत्राट द्या, अशी शिफारस तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी २०१२मध्ये केली होती.

विधिमंडळाच्या अधिवेशनात पहिले तीन दिवस कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा विरोधी पक्षाचा निर्णय अयोग्य होता. लोकांनी निवडून दिल्यावर आमदारांनी सभागृहात बसायला हवे होते.
काँग्रेसची भूमिका काहीही असली तरी हे आपले वैयक्तिक मत असून, आपले मत जर पक्षाला अयोग्य वाटत असेल तर पक्षाने आपल्यावर कारवाई करावी, असे राणे म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळाच्या चर्चेवर केलेल्या भाषणात जाहीर केलेल्या योजना या केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना सुरू झालेल्या योजना आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची सभागृहात विरोधी पक्षाकडून चिरफाड व्हायला हवी होती, असेही ते म्हणाले.

सूर्यकांताला चिक्कीचे कंत्राट देण्याची शिफारस मी केली व तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी ती ऐकली म्हणजे विरोधी पक्षनेत्याचे ते ऐकत होते हे माझ्याकरिता समाधानकारक आहे. राणे दोन निवडणुका हरले आहेत. त्यामुळे त्यांना असे संशोधन करायला वेळ मिळतो. त्यांनी संशोधन करावे मी त्यांचे मार्गदर्शन घेईन. २०१२ची घटना त्यांना आत्ताच कशी आठवली?- एकनाथ खडसे, महसूलमंत्री

Web Title: Recommendations for Chikki contract

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.