गोखलेंच्या निवासस्थानाचे पुनर्निर्माण
By Admin | Published: February 13, 2016 11:52 PM2016-02-13T23:52:49+5:302016-02-13T23:52:49+5:30
नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या पुण्यातील निवासस्थानाचे पुनर्निर्माण होत आहे. गोखले यांचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष सध्या सुरू असून, त्यानिमित्त महापालिकेने
पुणे : नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या पुण्यातील निवासस्थानाचे पुनर्निर्माण होत आहे. गोखले यांचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष सध्या सुरू असून, त्यानिमित्त महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. गोखले यांचे पणतू सुनील गोखले यांच्या उपस्थितीत महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते नुकतेच नूतनीकरणाच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले असून, गोखले इन्स्टिट्यूटमधील ही वास्तू लवकरच शंभर वर्षांपूर्वी होती त्याच स्वरूपात उभी राहील.
गोखले इन्स्टिट्यूटच्या आवारातील या बंगल्यात नामदार गोखले यांचे प्रदीर्घ काळ वास्तव्य होते. १९ फेब्रुवारी १९१५ ला गोखले यांचे याच वास्तूत निधन झाले. या निवासस्थानाची मालकी गोखले इन्स्टिट्यूटकडे आहे. गेली अनेक वर्षे ही वास्तू बंद होती. बरेच जुने बांधकाम असल्याने त्याला दुरूस्तीची गरज होती. महापालिकेच्या जुन्या वास्तुंच्या यादीत या निवासस्थानाचा समावेश होता. त्यातूनच मग हे निवासस्थान गोखले यांचे स्मारक म्हणून तयार करण्याचा विचार पुढे आला. काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, स्थानिक नगरसेवक माधुरी सहस्त्रबुद्धे व सुनील गोखले यांनी त्यासाठी प्रयत्न केले.
गोपाळ गणेश आगरकर यांचे शिष्य, महात्मा गांधी यांचे गुरू ही गोखले यांची ओळख सर्वपरिचित आहेच, मात्र त्यापेक्षाही वेगळी ओळख म्हणजे त्यांच्या अभ्यासूपणाचा त्याकाळात इंग्लडच्या संसदेलाही दरारा वाटत असे. गोखले यांचा जन्म (९ मे १८६६) कोकणातील असला तरी त्यांची कर्मभूमी पुणेच होती. सन १९०२ ते १९०५ या काळात ते तत्कालीन पुणे नगरपालिकेचे अध्यक्ष होते. आगरकर, लोकमान्य टिळक यांच्या देशप्रेमाने भारावलेल्या गोखले यांनीही नंतर तीच कास धरली. भारत सेवक समाजाची स्थापना करून त्यांनी त्यावेळच्या असंख्य युवकांमध्ये देशप्रेमाची ज्योत पेटवली. या बंगल्याचे बांधकाम दगडी आहे. त्यात ७ खोल्या आहेत. जुन्या काळात असायचे त्याप्रमाणे त्याला उतरते छप्पर आहे. आतील लाकडी बांधकाम तसेच भिंती, फरशी हे सर्वकाही पुर्वी जसे होते त्याप्रमाणेच बांधण्यात येणार असल्याचे पालिकेच्या हेरिटेज विभागाचे प्रमुख अभियंता शाम ढवळे यांनी सांगितले. येत्या ६ महिन्यात हे काम पुर्ण होईल असे ते म्हणाले. त्यानंतर त्यात गोखले यांच्या कार्याला साजेसे असे संग्रहालय गोखले इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने सुरू करण्याचा प्रयत्न आहे. (प्रतिनिधी)
येत्या ६ महिन्यात हे काम पुर्ण होईल असेहेरिटेज विभागाचे प्रमुख अभियंता शाम ढवळे म्हणाले. त्यानंतर त्यात गोखले यांच्या कार्याला साजेसे असे संग्रहालय गोखले इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने सुरू करण्याचा प्रयत्न आहे.