बुडीत कर्जे रोखण्यासाठी कर्जदाराचा आवाज रेकॉर्ड करा
By Admin | Published: February 8, 2016 04:32 AM2016-02-08T04:32:41+5:302016-02-08T04:32:41+5:30
उद्योग, व्यवसायासाठी दिली गेलेली हजारो कोटी रुपयांची कर्जे बुडीत होऊ नयेत यासाठी केंद्रीय गुप्तचर खात्याने (सीबीआय) कर्ज द्यायच्या आधी कर्जदाराच्या आवाजाचे विश्लेषण
डिप्पी वांकाणी , मुंबई
उद्योग, व्यवसायासाठी दिली गेलेली हजारो कोटी रुपयांची कर्जे बुडीत होऊ नयेत यासाठी केंद्रीय गुप्तचर खात्याने (सीबीआय) कर्ज द्यायच्या आधी कर्जदाराच्या आवाजाचे विश्लेषण (व्हॉईस लेयर अॅनालिसिस) करण्याची सूचना केली आहे. रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाची शाखा असलेल्या सेंटर फॉर अॅड्व्हान्सड फिनान्शियल रिसर्च अॅण्ड लर्निंगने (सीएएफआरएएल) आयोजित केलेल्या कार्यक्रमात सीबीआयने ही सूचना केली आहे. या वेळी ३०पेक्षा जास्त बँकांचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते. कर्ज मागणाऱ्या व्यक्तीची बँकेचे कर्ज बुडविणाऱ्यांशी मैत्री आहे का हे त्याच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून तपासून बघावे, अशीही सूचना सीबीआयने केली आहे.
सीएएफआरएएलच्या अधिकाऱ्यांनी व्हॉईस लेअर अॅनालिसिसच्या सूचनेवर विचार केला जात आहे; तथापि त्यात त्यासाठी येणारा खर्च, कौशल्य आणि त्याला कायद्याचा आधार ही काही मोठी आव्हाने आहेत, असे सांगितले. या विषयावर काही दिवसांपूर्वी सीबीआयचे सह संचालक केशव कुमार आणि गुजरात फोरेन्सिक आॅडिट युनिव्हर्सिटीच्या आचार्य मॅडम यांची भाषणे आयोजित करण्यात आली होती. कुमार यांनी कर्ज वाटायच्या आधी व्हॉईस लेअर अॅनालिसिस केले जावे अशी सूचना केली होती. या सूचनेने विचार करायला लावला, असे सीएएफआरएएलचे कार्यक्रम संचालक रवींद्र संघवी यांनी म्हटले. संघवी म्हणाले की, ‘‘ही सूचना चांगली असली तरी तिची अंमलबजावणी करताना अनेक आव्हाने आहेत. त्यासाठीच्या सॉफ्टवेअरचा खर्च कितीतरी कोटी रुपये येईल. शिवाय त्याचे विश्लेषण करण्यासाठी मनोविकार तज्ज्ञाची आवश्यकता लागेल. शिवाय बँकांच्या हजारो शाखांमध्ये हे सॉफ्टवेअर उपलब्ध करून देणे शक्य नाही. आम्ही ग्राहकांच्या परवानगीशिवाय त्याच्या आवाजाचे ध्वनिमुद्रण (रेकॉर्डिंग) करू शकत नाही. म्हणून व्हॉईस लेयर अॅनालिसिसबाबत बँका काय करू शकतात याचा कायदेशीर सल्ला घेतील.’’
सीबीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भाषणांत आणखी काही सूचना करण्यात आल्या. त्यात हस्तलिखिताचे विश्लेषण, मानसोपचार विश्लेषण, सोशल मीडियाची छानणी यांचा समावेश होता. बँका हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडीत असल्याचे जाहीर करतात; परंतु त्यांनी आमच्या सूचना राबविल्या तर प्रत्यक्ष कर्ज वाटायच्या आधी अर्जाची छानणी करणे अधिक परिणामकारक ठरेल.