Corona Vaccination: राज्यात दिवसभरात ११ लाख नागरिकांचे विक्रमी लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 08:04 AM2021-08-22T08:04:21+5:302021-08-22T08:04:43+5:30
Corona Vaccination: दिवसाला १० लाखांपेक्षा अधिक लसीकरण केले जाऊ शकते, हे आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सिद्ध केले असून, राज्याची याहीपेक्षा अधिक लसीकरणाची क्षमता असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने शनिवारी पुन्हा एकदा दमदार कामगिरी करीत दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांना लस देण्याचा विक्रम केला आहे. एकाच दिवशी सुमारे अकरा लाखांच्या आसपास नागरिकांचे लसीकरण करून आरोग्य विभागाने केलेल्या अतुलनीय कामाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली असून याबद्दल आरोग्य यंत्रणेचे कौतुक करीत अभिनंदन केले आहे.
दिवसाला १० लाखांपेक्षा अधिक लसीकरण केले जाऊ शकते, हे आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सिद्ध केले असून, राज्याची याहीपेक्षा अधिक लसीकरणाची क्षमता असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत शनिवारी सायंकाळी सातपर्यंत ५२०० लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून १० लाख ९६ हजार ४९३ नागरिकांना लस देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता, आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी वर्तविली आहे.
पाच कोटींचा टप्पा आधीच पार
काही दिवसांपूर्वी राज्याने लसीकरणाचा पाच कोटींच्या डोसचा टप्पा ओलांडला होता. देशात उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे. शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत १० लाख ९६ हजार ४९३ नागरिकांचे लसीकरण झाले. यापूर्वी ३ जुलै रोजी ८ लाख ११ हजार जणांना लस देऊन राज्याने विक्रमी कामगिरी केली होती. त्यानंतर स्वातंत्र्या दिनाच्या पूर्वसंध्येला ९ लाख ६४ हजार ४६० नागरिकांना लस
देऊन आधीचा विक्रम मोडला. शनिवारच्या लसीकरणानंतर हा
विक्रम महाराष्ट्राच्या नावावर नोंदविल्याचे डॉ. व्यास यांनी सांगितले.