हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये डोंबिवलीच्या तरुणाचा विक्रम, १८ तास ५० मिनिटांत कापले ९२ किमी अंतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 06:05 AM2017-10-20T06:05:44+5:302017-10-20T06:06:07+5:30
- मुरलीधर भवार
डोंबिवली : शहरातील स्टार कॉलनीत राहणाºया तुषार परब या तरुणाने २८ सप्टेंबरला हिमालयाच्या पर्वतरांगांत अल्ट्रा रनिंगमध्ये विक्रम केला आहे. १८ तास ५० मिनिटांत त्याने ९२ किलोमीटरचे अंतर पार केले आहे. समुद्रसपाटीपासून २ हजार ४०० ते ३ हजार ३०० मीटर उंचीवर सलग अल्ट्रा रनिंग त्याने केले आहे.
तुषार याने गढवालमधील उत्तर काशी जिल्ह्यातील भटवाडी, बारसू, दयारा, दारवा, दोडीताल, माँझी या विभागांतून १८ तास ५० मिनिटे अल्ट्रा रनिंग केले आहे. डेहराडून ते मसुरीपर्यंत हा रन तुषारने पार केला. तुषारने गढवालच्या बाराहात पर्वतरांगांत विक्रम केला. हा भाग हिमालयाच्या पर्वतरांगांत येतो.
तुषारने मायक्रोबायोलॉजी या विषयातून पदवीचे शिक्षण घेतले आहे. तर ‘वाइल्डलाइफ कन्झर्व्हेशन’ विषयातून ८५ टक्के गुण मिळवून पदवी मिळवली आहे. २०११ पासून तुषार गिर्यारोहणाचे अनेक धाडसी उपक्रम करत आला आहे. शाळेत असताना त्याला मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची आवड होती. गढवालमधील एका मॅरेथॉन स्पर्धेत त्याने सहभाग घेतला. तेव्हापासून त्याच्या धाडसाला आणि साहसाला गढवालमधील हिमालयाची पर्वतश्रेणी खुणावत होती. ही पर्वतश्रेणी सर करण्याचा त्याचा मानस होता. गिरीविराज हायकर्स संस्थेतर्फे गिर्यारोहण क्षेत्रात त्याचे येणे झाले. गढवालमध्ये तो यापूर्वी २० पेक्षा जास्त वेळा गेला आहे. तुषारने २४ तासांत १२० किलोमीटर अल्ट्रा रनिंग करण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले होते. त्याला ते लक्ष्य गाठता आले नाही. १८ तास ५० मिनिटांत त्याने केवळ ९२ किलोमीटर अंतर कापले आहे. पर्वतरांगांत धुके दाट असल्याने पुढे जाता आले नाही.
आधीचा विक्रम शर्माच्या नावावर
तुषारच्या पूर्वी अल्ट्रा रनिंगमध्ये १२० किलोमीटरचे अंतर २४ तासांत पूर्ण करण्याचा विक्रम प्रज्वल शर्मा याने केला असल्याची नोंद आहे. त्याच्या विक्रमापाठोपाठ तुषारचा विक्रम गणला गेला असल्याचे सांगण्यात येत आहे.