कचरा करणाऱ्यांकडून साडेआठ कोटी दंड वसूल
By admin | Published: June 8, 2017 02:25 AM2017-06-08T02:25:16+5:302017-06-08T02:25:16+5:30
अनेक वादानंतर पुनर्जीवन मिळालेल्या क्लीन अप मार्शल्सने स्वच्छतेची जोरदार कामगिरी सुरू ठेवली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अनेक वादानंतर पुनर्जीवन मिळालेल्या क्लीन अप मार्शल्सने स्वच्छतेची जोरदार कामगिरी सुरू ठेवली आहे. त्यानुसार सार्वजनिक परिसर अस्वच्छ करणाऱ्या तीन लाख ९१ हजार बेशिस्त मुंबईकरांकडून मार्शल्सने तब्बल साडेआठ कोेटी दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे ही कारवाई एका वर्षाच्या कालावधीत करण्यात आली आहे.
अनेक तक्रारींनंतर बंद करण्यात आलेली क्लीनअप मार्शल्स संकल्पना जुलै २०१६मध्ये पुन्हा सुरू करण्यात आली. दुसऱ्याच महिन्यात मार्शल्सने एक कोटी १० लाख
रुपये दंड वसूल केला.
यामध्ये सार्वजनिक ठिकाणी
थुंकणे व कचरा फेकणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सार्वजनिक परिसर अस्वच्छ केल्याप्रकरणी दोनशे ते हजार रुपये दंड संबंधित लोकांना करण्यात आला आहे. प्रत्येक
वॉर्डच्या लोकसंख्येनुसार मार्शल्सची नियुक्ती करण्यात आल्याने त्यांची नजर चौफेर आहे.
पालिकेच्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी ते ३१ मे या कालावधीत मार्शल्सने तीन कोटी ३६ लाख रुपये दंड वसूल केला. यामध्ये एप्रिल महिन्यात सर्वाधिक ८९.०९ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामुळे वर्षभरातच पालिकेच्या तिजोरीत साडेआठ कोटी रुपये जमा झाले आहेत. या रकमेतील निम्मे म्हणजेच सुमारे चार कोटी रुपये मार्शल्स पुरवणाऱ्या कंपनीच्या तिजोरीत जाणार आहेत. मात्र मार्शल्सच्या या कामगिरीमुळे त्यांचे कंत्राट आणखी एक वर्षासाठी वाढविण्यात येणार आहे.
असा वसूल केला दंड
१ जुलै २०१६ ते ३१ मे २०१७ -साडेआठ कोटी रुपये
आॅगस्ट २०१६ - एक कोटी १० लाख रुपये
१ जानेवारी ते ३१ मे - तीन कोटी ३६ लाख रुपये
एप्रिल २०१७ - ८९.०९
लाख रुपये