लक्ष्यपूर्तीसाठी ६०० कोटींची वसुली हवी, वसुली न झाल्यास संबंधित सहा. आयुक्तांवर कारवाईचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 06:49 AM2018-03-06T06:49:50+5:302018-03-06T06:49:50+5:30
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मालमत्ताकर आणि पाणीपट्टीबरोबरच इतर करांची वसुली न झाल्यास संबंधित सहायक आयुक्तांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, आता महापालिका हद्दीत करवसुलीची मोहीम जोमाने सुरू झाली आहे.
ठाणे - ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मालमत्ताकर आणि पाणीपट्टीबरोबरच इतर करांची वसुली न झाल्यास संबंधित सहायक आयुक्तांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, आता महापालिका हद्दीत करवसुलीची मोहीम जोमाने सुरू झाली आहे.
विविध करांचा भरणा करण्यासाठी जनजागृती, नोटिसा बजावणे, मालमत्ता सील करणे, नळजोडणी खंडित करण्यासह विविध उपाय योजले जाऊ लागले आहेत. त्यानुसार, फेब्रुवारी २०१८ अखेर १७७५.८८ कोटींची वसुली झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ २१५.९५ कोटींनी अधिक आहे. परंतु, असे असले तरी दिलेले २४३९.४२ कोटींचे लक्ष्य गाठण्यासाठी आता अवघा एक महिन्याचा अवधी शिल्लक असून अद्यापही ६०० कोटींची वसुली शिल्लक असल्याने आयुक्तांनी हे पाऊल उचलले आहे.
मालमत्ताकर आणि पाणीपट्टीचे दिलेले उद्दिष्ट साध्य न झाल्यास संबंधित सहायक आयुक्त आणि त्या परिमंडळाचे उपायुक्त यांच्याविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. तसेच जे थकबाकीदार आहेत, त्यांची नावे जाहीर करण्याबरोबरच त्यांची नळजोडणी खंडित करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. मागील वर्षी फेब्रुवारीअखेरपर्यंत पालिकेच्या तिजोरीत १५५९.९४ कोटींची वसुली झाली होती. यंदा त्याच कालावधीत १७७५.८८ कोटींची वसुली झाली आहे. जी मागील वर्षीच्या तुलनेत २१५.९५ कोटींनी अधिक आहे. परंतु, अद्यापही निर्धारित केलेल्या लक्ष्यापेक्षा हे उत्पन्न तब्बल ६०० कोटींनी कमी आहे. त्यामुळे हे लक्ष्य गाठण्यासाठी पालिका आयुक्तांनी उपरोक्त इशारा दिला आहे. मालमत्ताकर विभागाला यंदा ५०८ कोटींचे लक्ष्य दिले असताना या विभागाने फेब्रुवारीअखेरपर्यंत ३८८ कोटींची वसुली केली आहे.
दुसरीकडे शहर विकास विभागानेदेखील मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ३३.१० कोटींची वसुली कमी करून पिछाडी घेतली आहे. मागील वर्षी या विभागाने ४४५.४७ कोटींची वसुली केली होती.
यंदा मात्र ती ४१२.३७ कोटींवर आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यंदा २५.९५ कोटींची अधिक वसुली केली आहे. मागील वर्षी या विभागाने ५४.४३ कोटींची वसुली केली होती. यंदा मात्र ८०.३८ कोटींची वसुली केली आहे. दरम्यान, यंदा पाणीपुरवठ्याची वसुली मात्र काही अंशी का होईना वाढली आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत या विभागाने ५.२७ कोटींची अधिकची वसुली केली असल्याने ही पाणीपुरवठा विभागासाठी जमेची बाजू मानली जात आहे. परंतु, दिलेले लक्ष्य गाठण्यासाठी या विभागाला अद्यापही ५४.४३ कोटींची वसुली करणे क्रमप्राप्त ठरले आहे. त्यानुसार, थकबाकीदारांचे नळजोडण्या कापणे आदींसह इतर योजनांचा अवलंब केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील वर्षी या विभागाने ६५.३० कोटींची वसुली केली होती. यंदा मात्र ७०.५७ कोटीच वसूल केले.
एकूणच ठाणे महापालिकेतील या महत्त्वाच्या विभागांसोबतच इतर विभागांनादेखील थकबाकी आणि वसुलीसाठी लक्ष्य देण्यात आले आहे. त्यानुसार, आतापर्यंत विविध विभागांमार्फत करण्यात आलेल्या वसुलीनुसार पालिकेच्या तिजोरीत १७७५.८८ कोटींचे उत्पन्न आले आहे. मागील वर्षी ते १५५९.९४ कोटी एवढे होते.
मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ २१५.९५ कोटींनी अधिक आहे. असे असले तरीदेखील एकूण दिलेल्या २४३९.४२ कोटींचे लक्ष्य पार करण्यासाठी अद्यापही ६०० कोटी वसूल होणे आवश्यक असून यासाठी एक महिन्याचाच अवधी शिल्लक राहिला आहे.
१२० कोटींची वसुली अद्याप बाकी
गेल्या वर्षीच्या तुलनेत मालमत्ता कराची वसूली सुमारे ६० कोटींनी अधिक असली तरीही लक्ष्य गाठण्यासाठी एका महिन्यात या विभागाला १२० कोटींची वसुली करायची आहे. तर, स्थानिक संस्थाकर बंद झाला आणि आता जीएसटी लागू झाला आहे. त्यामुळे या करापोटी येणाºया वसुलीत मात्र घट झाली आहे. स्थानिक संस्थाकरापोटी गेल्या वर्षी १५७.२५ कोटींची वसुली झाली होती. परंतु, यंदा मात्र केवळ ७१.०४ कोटीच वसूल झाले आहेत.