आजपासून राज्यभर ‘मेगा’ पोलीस भरती
By Admin | Published: February 3, 2016 03:37 AM2016-02-03T03:37:45+5:302016-02-03T03:39:08+5:30
राज्य पोलीस दलात रिक्त असलेल्या तब्बल ४ हजार १४ पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया ३ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ३ ते १८ फेब्रुवारीपर्यंत इच्छुक उमेदवारांचे आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.
मुंबई : राज्य पोलीस दलात रिक्त असलेल्या तब्बल ४ हजार १४ पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया ३ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ३ ते १८ फेब्रुवारीपर्यंत इच्छुक उमेदवारांचे आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. यंदा महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. यंदापासून धावण्याचे अंतर कमी करण्यात आले. यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी ५ कि.मी.ऐवजी
१६०० मीटर व महिला उमेदवारांसाठी
३ कि.मी.ऐवजी ८०० कि.मी. धावण्याची चाचणी घेण्यात येणार आहे.
राज्य पोलीस दलात १०.४८ टक्के महिला पोलीस कार्यरत आहेत. पोलीस दलात महिलांच्या प्रतिनिधित्वात वाढ होण्यासाठी रिक्त पदांच्या ३० टक्के पदे महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. तसेच बँड पथकातही महिलांनी अर्ज करून भरती व्हावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. कारागृह शिपाई पदासाठी वेगळी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
रिक्त जागा राहिल्यास या पोलीस शिपाई भरतीमध्ये प्रतीक्षा यादीवर असलेल्या इच्छुक उमेदवारांची भरती केली जाणार आहे. भरतीत ३ टक्के पदे पोलिसांच्या पाल्यांसाठी व २ टक्के पदे ड्युटीवर असताना निधन झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)
कोल्हापुरात सैन्यभरती : महाराष्ट्रातील सहा व गोव्यातील दोन जिल्ह्यांमधील पात्र उमेदवारांसाठी कोल्हापुरात उद्या, बुधवारपासून सैन्यदलातील विविध पदांसाठीच्या भरती प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. शिवाजी विद्यापीठातील क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडा संकुलात २० फेब्रुवारीपर्यंत भरतीची प्रक्रिया चालणार आहे. यासाठी सुमारे ५७ हजार जण उपस्थित राहतील. उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी या वेळी पहिल्यांदाच तालुकानिहाय भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.