राज्यात आणखी ६० हजार पोलिसांची भरती
By admin | Published: May 5, 2015 01:16 AM2015-05-05T01:16:48+5:302015-05-05T01:16:48+5:30
वाकोला पोलीस स्थानकात घडलेल्या प्रकरणामुळे, पोलिसांवर कामाचा ताण आहे, असा सूर उमटला आहे. राज्यात २ लाख ४९ हजार पोलीस आहे.
नागपूर : वाकोला पोलीस स्थानकात घडलेल्या प्रकरणामुळे, पोलिसांवर कामाचा ताण आहे, असा सूर उमटला आहे. राज्यात २ लाख ४९ हजार पोलीस आहे. हे लक्षात घेता पोलिसांवर कामाचा ताण नाही. पण तसे असल्यास आॅक्टोबर महिन्यापासून नवीन पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. जवळपास ६० हजार पोलिसांची कुमक राज्याच्या सुरक्षेत तैनात होणार आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली. या घटनेतील तथ्य शोधण्यासाठी सखोल चौकशी होईल, चौकशीत निष्पन्न होणाऱ्या तथ्यानुसार कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
राम शिंदे सोमवारी गडचिरोलीच्या दौऱ्यावर आले होते. दौरा आटोपल्यानंतर ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. गडचिरोलीत त्यांनी शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांना मदतीचे आश्वासन दिले. शिवाय शौर्य पदकासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचेही ते म्हणाले. २००५ च्या पूर्वी नक्षलवाद्यांशी लढताना वीर मरण आलेल्या ९६ पोलिसांना शहिदांचा दर्जा देऊ. १० वर्ष त्याबद्दलचे प्रस्ताव प्रलंबित होते असेही राम शिंदे म्हणाले. गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक व कायद्याचा वचक राहिलेला नाही. शिक्षचे प्रमाण वाढण्यासाठी न्यायाधिशांच्या नियुक्त्या, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सक्ती, पोलिसांची गुणवत्ता वाढविण्यासाठी वेतनवाढ, त्यांचा निवासाचा प्रश्न सोडविण्यावरही सरकारचा भर आहे. कारागृहातील कैदी मोबाइलवर संभाषण करतात. हे थांबविण्यासाठी अत्याधुनिक दर्जाचे जॅमर लावण्यात येणार असल्याचे, ते म्हणाले.