आणखी भ्रष्ट मंत्र्यांची भरती - राष्ट्रवादी
By admin | Published: July 9, 2016 01:22 AM2016-07-09T01:22:02+5:302016-07-09T01:22:02+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आधीच भ्रष्टाचार व घोटाळ्यात अडकलेले असताना शुक्रवारी आणखी भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्यांची मंत्रिमंडळात भरती
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आधीच भ्रष्टाचार व घोटाळ्यात अडकलेले असताना शुक्रवारी आणखी भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्यांची मंत्रिमंडळात भरती करण्यात आली, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात भ्रष्टाचारासह विविध आरोप असलेल्या पाच जणांना स्थान देण्यात आले आहे. यामध्ये जयकुमार रावल यांच्यावर सहकारी बँक घोटाळ्याचा आरोप आहे. संभाजी पाटील-निलंगेकर यांची ४० कोटी रुपयांच्या जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी सीआयडीमार्फत चौकशी चालू आहे, तर गुलाबराव पाटील यांना बेकायदा जमीन बळकावल्याच्या प्रकरणात नुकतीच अटक करण्यात आली होती. पांडुरंग फुंडकर यांच्यावर राज्य सहकारी बँक घोटाळ्याचा आरोप आहे. रवींद्र चव्हाण यांच्यावर दलितांचा अवमान यासह खंडणी वसूल करणे, अपहरण करणे, धमकी देणे आदी १२ गुन्ह्यांची नोंद आहे, असा आरोप मलिक यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)