राज्यातील प्राध्यापकांची व तासिका तत्वावरील पदांची भरती लवकरच होणार : उदय सामंत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 01:40 PM2020-10-07T13:40:36+5:302020-10-07T13:44:40+5:30
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत महाविद्यालयांकडून शिकवला जाणारा ऑनलाइन अभ्यासक्रम ग्राह्य धरला जाणार आहे.
पुणे : राज्यातील प्राध्यापकांची व तासिका तत्वावरील (सीेएचबी) पदांची भरती लवकरच केली जाणार आहे. तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या भरतीसाठी नेट- सेट पात्रताधारक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. त्यानंतर इतर उमेदवारांचा विचार करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत महाविद्यालयांकडून शिकवला जाणारा ऑनलाइन अभ्यासक्रम ग्राह्य धरला जाणार असून त्या आधारेच परीक्षा घेतल्या जातील. मात्र ,कोरोना परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतरच प्रत्यक्ष महाविद्यालय सुरू होतील, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी स्पष्ट केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तर्फे घेतल्या जाणाऱ्या ऑनलाइन ऑफलाईन परीक्षांचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उदय सामंत बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च शिक्षण संचालक धनराज माने, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे आदी उपस्थित होते.
सामंत म्हणाले, पुणे विद्यापीठातर्फे सुमारे २ लाख विद्यार्थ्यांची ऑनलाइन पद्धतीने तर ५० हजार विद्यार्थ्यांची ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यापीठाने परीक्षेसाठी आवश्यक असणारी सर्व तयारी केली आहे. पुणे, अहमदनगर,नाशिक जिल्ह्यातील परीक्षा सुरळीतपणे पार पडाव्यात यासाठी जिल्हा प्रशासन व विद्यापीठ प्रशासन यांच्यातील समन्वयासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. विद्यापीठात घेण्यात आलेल्या बैठकीत तीनही जिल्ह्यातील प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कोरोनामुळे पुणे विद्यापीठाने शुल्कवाढ मागे घेतली आहे.त्यामुळे एकाही संलग्न महाविद्यालयाने शुल्कवाढ करू नये. जिमखाना शुल्क, डेव्हलपमेंट शुल्क आदी प्रकारचे शुल्क महाविद्यालयांना करता येणार नाही. केवळ शैक्षणिक शुल्क आकारता येईल. विद्यार्थ्यांकडून वाढीव शुल्क आकारणी करणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर कारवाई केली जाईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले.