अन्न व औषध प्रशासनात निवृत्तांची भरती
By admin | Published: April 10, 2015 04:17 AM2015-04-10T04:17:47+5:302015-04-10T04:17:47+5:30
अन्न व औषध प्रशासनात (एफडीए) ३५२ पदे रिक्त असून, ही पदे भरण्याकरिता लोकसेवा आयोगामार्फत प्रयत्न सुरू आहेत.
मुंबई : अन्न व औषध प्रशासनात (एफडीए) ३५२ पदे रिक्त असून, ही पदे भरण्याकरिता लोकसेवा आयोगामार्फत प्रयत्न सुरू आहेत. मात्र या पदांकरिता जर कर्मचारी उपलब्ध होत नसतील तर एफडीएमधून निवृत्त झालेल्या इन्स्पेक्टरांना कंत्राटी पद्धतीने नेमण्यात येईल किंवा बीफार्म झालेल्यांना मानधन तत्त्वावर नियुक्त करण्याचा विचार करता येईल, अशी घोषणा अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली.
संजय दत्त यांनी याबाबत लक्षवेधी सूचना दाखल केली होती. त्यावरील चर्चेला उत्तर देताना बापट म्हणाले की, एफडीएत ११७६ पदे आहेत. त्यापैकी ३५२ पदे रिक्त आहेत. माणसांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित हे खाते असल्याने लोकसेवा आयोगामार्फत ही पदे भरण्याचा प्रयत्न केला. मात्र पदांकरिता पात्र उमेदवार प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे ही पदे रिक्त न ठेवता याच खात्यातून निवृत्त झालेल्या इन्स्पेक्टरांना कंत्राटी पद्धतीने नियुक्त करता येईल. त्याखेरीज बीफार्म झालेल्यांना मानधन देऊन सेवेत दाखल करून घेता येईल. सरकारी रुग्णालयांत जेनरिक औषधांच्या उपलब्धतेबाबत बापट म्हणाले की, प्रत्येक सरकारी रुग्णालयात आमदार निधीतून जेनरिक औषधांचे दुकान सुरू करण्याची केंद्राची योजना आहे. (विशेष प्रतिनिधी)