भरती घोटाळा, आठ दिवसांत कारवाई
By admin | Published: March 23, 2017 11:50 PM2017-03-23T23:50:28+5:302017-03-23T23:50:28+5:30
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील भरती प्रक्रियेतील घोटाळ्यांचा अहवाल निवृत्त न्यायाधीशांमार्फत प्राप्त झाल्यानंतर आठच
मुंबई : कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील भरती प्रक्रियेतील घोटाळ्यांचा अहवाल निवृत्त न्यायाधीशांमार्फत प्राप्त झाल्यानंतर आठच दिवसांत राज्य शासन त्या अहवालाच्या अनुषंगाने कारवाई करेल, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आज विधानसभेत केली.
भाजपाचे सुरेश हाळवणकर यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. २०१० ते २०१५ या काळात हा घोटाळा झाला. त्याविरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने अनेकदा आंदोलन केले. डी.व्ही. मुळे हे कुलसचिव असतानाच्या काळात गंभीर घोटाळे झाल्याच्या अनेक तक्रारी आहेत. या संपूर्ण प्रकरणाची विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करणार का, असा प्रश्न हाळवणकर यांनी केला. त्यावर, निवृत्त न्यायाधीश शानबाग यांच्यामार्फत चौकशी करण्यात येत आहे. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आठच दिवसांत दोषींविरुद्ध कारवाई केली जाईल, असे राज्यमंत्री वायकर यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात आधीही चौकशी करण्यात आली होती आणि तिचा अहवालदेखील प्राप्त झालेला आहे. त्यात घोटाळे समोरदेखील आलेले आहेत, असे त्यांनी सांगितले.
या प्रकरणात आधीही अनेक तक्रारी झालेल्या आहेत. विद्यापीठापासून मंत्रालयापर्यंत त्या दडवून ठेवण्यात आल्या, असा आरोप आहे. या प्रकरणी मंत्रालय अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात येईल, असे वायकर यांनी भाजपाचे डॉ. सुनील देशमुख यांच्या उपप्रश्नात सांगितले. या प्रकरणातील एक चौकशी अहवाल १५ दिवसांपूर्वीच शासनाला प्राप्त झाला आहे; त्या आधारे कारवाईची मागणी सुजित मिणचेकर यांनी केली. तथापि, निवृत्त न्यायाधीशांच्या अहवालानंतर तत्काळ कारवाई केली जाईल, असे आश्वासन राज्यमंत्री वायकर यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)