डीआरडीओमध्ये शास्त्रज्ञांची लवकरच भरती
By admin | Published: August 5, 2015 01:09 AM2015-08-05T01:09:08+5:302015-08-05T01:09:08+5:30
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेअंतर्गत (डीआरडीओ) येणाऱ्या विविध प्रयोगशाळांमध्ये विविध पदांवर नवीन शास्त्रज्ञांची आवश्यकता आहे
पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेअंतर्गत (डीआरडीओ) येणाऱ्या विविध प्रयोगशाळांमध्ये विविध पदांवर नवीन शास्त्रज्ञांची आवश्यकता आहे. यासंदर्भातील प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून, त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यात १२०० शास्त्रज्ञांची भरती होण्याची शक्यता असल्याची माहिती डीआरडीओच्या मनुष्यबळ विकास विभागाच्या संचालक डॉ. हिना गोखले यांनी सोमवारी दिली.
डीआयएटीमधील (डिफेन्स इन्स्टिट्यूट आॅफ अॅडव्हान्स्ड् टेक्नॉलॉजी) कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. नव्या शास्त्रज्ञांच्या भरतीसाठी अर्थमंत्रालयाने मान्यता दिली आहे. त्यानंतर या नियुक्तीसाठीचा नियमित प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठविण्यात आला असून, लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. ही भरती डीआरडीओच्या (डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट आॅर्गनायझेशन) नियमित भरतीप्रक्रियेसारखीच होईल. यात सुरुवातीला ४०० व त्यानंतर दोन टप्प्यांत अन्य ८०० शास्त्रज्ञांची भरती होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.