सहा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या फेरबदल्या, सोयीच्या ठिकाणी नियुक्ती
By admin | Published: May 18, 2017 12:10 AM2017-05-18T00:10:12+5:302017-05-18T00:10:12+5:30
राज्य पोलीस दलातील सहा पोलीस अधीक्षक/उपआयुक्तांच्या फेरबदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्यासह आठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी रात्री गृहविभागाकडून जारी करण्यात आले.
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य पोलीस दलातील सहा पोलीस अधीक्षक/उपआयुक्तांच्या फेरबदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्यासह आठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी रात्री गृहविभागाकडून जारी करण्यात आले.
मंगळवारी रात्री आणखी सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करून नव्या जागी नियुक्ती करण्यात आली. त्यामध्ये नवी मुंबईच्या मुख्यालयात बदली झालेल्या प्रवीण पवार यांची नवी मुंबई परिमंडळ-२च्या उपआयुक्तपदी फेरबदली करण्यात आली आहे. नागपूर लोहमार्गचे अधीक्षक साहेबराव पाटील यांची पदोन्नतीवर पुणे शहरात प्रशासन विभागात अप्पर आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. पहिल्या आदेशात त्यांची तुरुंग विभागाच्या औरंगाबादच्या उपमहानिरीक्षकपदी बदली दर्शविण्यात आलेली होती.
अधीक्षक मनीषा दुबुले यांची नाशिक पीसीआरच्या ऐवजी नानवीजला पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर नानवीजला बदली दाखविलेल्या यशवंत सोळंखे यांना आता सीआयडीच्या अमरावतीचे अधीक्षकपद देण्यात आले आहे. तेथील अधीक्षक विजय खरात यांची मुंबईतील पोलीस मुख्यालयात प्रशासन विभागात बदली करण्यात आली आहे. धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली झालेल्या संजय जाधव यांना आता नवी मुंबईतील एसआरपी गट क्रं. ११ च्या समादेशकपद नियुक्ती केली आहे.
गडचिरोलीच्या अप्पर अधीक्षकपदी बदली झालेल्या ज्योती क्षीरसागर यांची सीआयडीच्या पुणे मुख्यालयात आर्थिक गुन्हे अधीक्षकपदी नियुक्ती केली आहे. तर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या नंदकुमार ठाकूर यांची नाशिकच्या पोलीस अकादमीत बदली करण्यात आली आहे.