भरती ऑनलाइन परीक्षा ‘सीईटी सेल’कडे देणार?; मंत्रालय पातळीवर चाचपणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 11:05 AM2023-01-17T11:05:32+5:302023-01-17T11:05:32+5:30
खासगी कंपन्यांची गरज काय?; ‘लोकमत’च्या बातमीनंतर चाचपणी सुरू
दीपक भातुसे
मुंबई : शासकीय नोकर भरतीच्या ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या ‘टीसीएस’ आणि ‘आयबीपीएस’ या खासगी कंपन्या सक्षम नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ने समोर आणल्यानंतर मंत्रालयीन पातळीवर याबाबतच्या पर्यायांवर चाचपणी सुरू झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्याच्या ‘सीईटी सेल’मार्फत दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांच्या यशस्वी ऑनलाइन परीक्षा घेतल्या जातात. त्यामुळे भरती परीक्षाही या सीईटी सेलमार्फत घेतल्या जाऊ शकतात.
मागील आठवड्यात १० जानेवारीला ‘नियुक्त कंपन्यांची परीक्षा घेण्याची क्षमताच नाही’ या शीर्षकाची बातमी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली होती. या बातमीवर त्याच दिवशी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली व पर्याय शोधण्याच्या किंवा नियुक्त कंपन्यांना मदत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या.
‘सीईटी सेल’ सक्षम
टीसीएस आणि आयबीपीएस कंपन्यांकडे एका दिवसात केवळ १० ते १५ हजार उमेदवारांची परीक्षा घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे या कंपन्यांना ‘सीईटी सेल’ची सेंटर्स पुरवून परीक्षा घेता येऊ शकते, का याची चाचपणी सुरू आहे. असे झाले तर ‘सीईटी सेल’ची संपूर्ण यंत्रणा या कंपन्यांना द्यावी लागेल. शासनाने यंत्रणाही द्यायची आणि कंपनीला पैसेही द्यायचे, असे त्यामुळे घडू शकते. त्याऐवजी ‘सीईटी सेल’कडेच जबाबदारी दिली तर परीक्षा सुरळीत पार पडू शकतात, असा एक सूर असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
...आणि पैसाही वाचेल
सीईटी सेल दरवर्षी साधारणतः १० लाख विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा सुरळीत पाडते. अर्ज भरणे, कागदपत्रांची छाननी, परीक्षा पार पाडणे हे विनाविघ्न पार पाडत असते. त्यामुळे शासकीय नोकर भरतीसाठीही ‘सीईटी सेल’चा वापर केल्यास पैसाही वाचू शकतो.