उद्योगांना सांडपाण्याचा पुनर्वापर अनिवार्य
By admin | Published: May 10, 2016 03:55 AM2016-05-10T03:55:54+5:302016-05-10T03:55:54+5:30
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात पाणी वाटपबाबत प्राधान्य कोणाला यावरून वातावरण तापले असताना आता सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा पुनर्वापर करणे उद्योगांना अनिवार्य करण्यात येणार आहे
मुंबई : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात पाणी वाटपबाबत प्राधान्य कोणाला यावरून वातावरण तापले असताना आता सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा पुनर्वापर करणे उद्योगांना अनिवार्य करण्यात येणार आहे. या बाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज लोकमतला सांगितले.
उद्योगांनी सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याचा प्रयोग मुंबई नजीकच्या तळोजा एमआयडीसीमध्ये यशस्वी झाला आहे. या नंतर पहिल्या टप्प्यात राज्यातील मोठ्या एमआयडीसींमध्ये सांडपाणी पुनर्वापरासाठीचे प्रकल्प उभारण्यात येतील. तसेच, उद्योगांनीही ते उभारावेत यासाठी प्रोत्साहन दिले जाईल.
असा पुनर्वापर मोठ्या प्रमाणात झाल्यास पिण्यासाठी आणि शेतीसाठी अधिक पाणी देणे शक्य होईल, असे देसाई म्हणाले.
आपल्याकडे वापरलेल्या पाण्यापैकी ७० टक्के पाण्याचा पुनर्वापर करणे शक्य आहे. अनेक देशांमध्ये असा पुनर्वापर केला जातो. सिंगापूर हे त्यासाठीचे मॉडेल मानले जाते. तेथील पाणी पुनर्वापराचा अभ्यास करण्यासाठी एमआयडीसीची एक चमू लवकरच त्या ठिकाणी जाणार आहे, असे देसाई यांनी सांगितले. उद्योगांना पाणी दिल्याने शेती आणि पिण्याच्या पाण्याबाबत अन्याय होतो, अशी टीका बरेचदा होते. या बाबत देसाई म्हणाले की, पाणीवाटपाचा प्राधान्यक्रम ठरलेला आहे. त्या नसुारच वाटप होत असते.
उद्योगांवर पाणी पळविण्याचा आरोप होतो पण आज नवी
मुंबई, मीरा भार्इंदर, ठाणे,
उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, उरण व उरण तालुक्यातील २७
ग्राम पंचायतींना एमआयडीसी स्वत:च्या पाणीसाठ्यांमधून पिण्याचे पाणी पुरविते. अशी राज्यात इतरत्रही अनेक उदाहरणे आहेत. (विशेष प्रतिनिधी)