पुणे, साताऱ्याला रेड, नाशिक, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 09:36 AM2024-08-04T09:36:37+5:302024-08-04T09:37:31+5:30

गेल्या काही दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर अनेक भागांत जोरदार पाऊस होत आहे.

Red alert for Pune, Satara, Orange alert issued for districts of Nashik, Vidarbha | पुणे, साताऱ्याला रेड, नाशिक, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

पुणे, साताऱ्याला रेड, नाशिक, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

पुणे : हवामान विभागाने पुढील ४ दिवस राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.  घाटमाथ्यावर रेड अलर्ट आहे.

    गेल्या काही दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर अनेक भागांत जोरदार पाऊस होत आहे. शनिवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती.  पुढील चार दिवस विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांतही जोरदार पावसाची शक्यता आहे. सातारा, पुणे जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे.

या जिल्ह्यांना अलर्ट -
रेड अलर्ट - पुणे, सातारा घाट माथा 
ऑरेंज अलर्ट - विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांतील काही भागात ऑरेंज अलर्ट आहे.
यलो अलर्ट : कोल्हापूर, नाशिक, नगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. 

कोल्हापुरात पूरस्थिती ‘जैसे थे’
कोल्हापूर : काेल्हापूर जिल्ह्यात शनिवारी पावसाने उसंत घेतली असली तरी पूरस्थिती कायम आहे. धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्याने विसर्ग कायम आहे. राधानगरीतून प्रतिसेकंद ५७८४ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पंचगंगेची पातळी ४२.१ फूट असून अद्याप ७४ बंधारे पाण्याखाली असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

दरड कोसळली, रेल्वे वाहतूक विस्कळीत
कसारा : सततच्या पावसामुळे शनिवारी नाशिक-कल्याण मार्गावरील कसारा घाटात टी.जी.आर.३ या बोगद्याजवळ सकाळी रेल्वे रुळावर दरडी कोसळल्याने मुंबईकडे जाणाऱ्या व येणाऱ्या मेल, एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. 
- परिणामी अपलाईनने जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक मिडल लाईनने वळवून रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात आली. 
- सकाळी राज्यराणी एक्स्प्रेस इगतपुरी रेल्वे स्थानकात असतानाच दरड कोसळल्याने पुढील अनर्थ टळला. उंबरमाळीजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने रेल्वेसेवा ठप्प झाली होती.  

प्रकल्प ओव्हरफ्लो, सतर्कतेचा इशारा
गोंदिया : जुलै महिन्यात सलग १२ दिवस आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर कायम असल्याने जिल्ह्यातील चार मध्यम आणि सात लघू प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. धरणाची पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी शनिवारी सकाळी पुजारीटोला धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आले.  

सातारा : वीर धरणातूनही विसर्ग वाढविल्याने नीरा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. परिणामी खंडाळा तालुक्यात लाेणंदजवळचा नीरा जुना पूल आणि वाठार-वीर रस्त्यावरील वाहतूक बंद केली. २४ तासांत महाबळेश्वरला ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

वारणा नदीकाठी पूरस्थिती कायम
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये  पावसाचा जोर असल्याने वारणा धरणातून विसर्ग कायम आहे.
त्यामुळे वारणा नदीकाठी पूरस्थिती अजूनही कायम आहे.

Web Title: Red alert for Pune, Satara, Orange alert issued for districts of Nashik, Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.