Maharashtra Red Alert Rain : रेड अलर्ट : पावसाचे आज वादळी अधिवेशन!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 05:39 AM2022-07-11T05:39:00+5:302022-07-11T05:39:49+5:30
भारतीय हवामान शास्त्र विभागाने सोमवारी संपूर्ण कोकण पट्टा आणि मध्य महाराष्ट्राला रेड अलर्ट दिला आहे.
मुंबई : मुंबईत कमी वेळेत जास्त कोसळणाऱ्या पावसाने आता विश्रांती घेतली असली तरी दुसरीकडे भारतीय हवामान शास्त्र विभागाने सोमवारी संपूर्ण कोकण पट्टा आणि मध्य महाराष्ट्राला रेड अलर्ट दिला आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नाशिकसह लगतच्या परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. गुजरातमधील काही जिल्ह्यांनादेखील रेड अलर्ट असून, येथेही अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीलगत द्रोणीय क्षेत्र आहे. गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरात धो धो कोसळणाऱ्या पावसाने गेल्या दोन एक दिवसांपासून बऱ्यापैकी विश्रांती घेतली आहे. सोमवारी देण्यात आलेल्या रेड अलर्टमुळे मुंबईकरांवर अतिवृष्टीची टांगती तलवार कायम आहे.