मुंबई, ठाणेसह कोकणात रेडअलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 07:57 AM2020-09-22T07:57:56+5:302020-09-22T07:58:05+5:30
पुढील ४८ तास कोकण, गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात काही काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे.
पुणे/औरंगाबाद/कोल्हापूर : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातील द्रोणीय स्थिती यामुळे राज्यात सर्वत्र मॉन्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. पुढील ४८ तास मुंबई, ठाणेसह कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये रेडअलर्ट दिला आहे. तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात मंगळवारी तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पुढील ४८ तास कोकण, गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात काही काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट दिला असून घाट परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातही औरंगाबाद येथे मुसळधार पावसाची शक्यता असून सर्वदूर पावसाची शक्यता आहे. विदर्भातही अनेक मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आंबोली घाटात दरड कोसळली
सिंधुदुर्ग जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने झोडपून काढले. सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला, कुडाळ तालुक्यात तुफान पाऊस झाला. आंबोली येथे दरड कोसळल्याने वाहतूक धिम्या गतीने सुरू होती.
मराठवाड्यात ९ मंडळांत अतिवृष्टी
मराठवाड्यात पावसाचा जोर कायम आहे. सोमवारी सकाळपर्यंत मराठवाड्यातील ९ महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. लातूर आणि परभणी जिल्ह्यांनी वार्षिक सरासरी ओलांडली असून औरंगाबाद, जालना, हिंगोली, बीड, लातूर आणि परभणी, अशा ६ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला.