विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी ‘रेड कार्पेट’!
By admin | Published: June 15, 2015 02:31 AM2015-06-15T02:31:38+5:302015-06-15T02:31:38+5:30
दोन महिन्यांची उन्हाळी सुटी घेतल्यानंतर सोमवारपासून प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुरुवात होणार आहे. शाळेचा पहिला दिवस कसा असणार,
मुंबई : दोन महिन्यांची उन्हाळी सुटी घेतल्यानंतर सोमवारपासून प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुरुवात होणार आहे. शाळेचा पहिला दिवस कसा असणार, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता असून शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.
शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे काळाचौकी येथील श्री सार्वजनिक बालमंदिर शाळेचे उद्घाटन करणार आहेत. या वेळी जैन अल्प सेवा संस्थान या संस्थेने शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत रेनकोट, शाळेचे दप्तर आणि वह्या वाटप कार्यक्रम आयोजित केला आहे. या वेळी सुमारे ८०० विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्याची प्रथा सुरू करण्यात आली आहे. काही शाळांनी पहिल्याच दिवशी गणवेशापासून सूट देण्याचा निर्णय घेतला होता. काही शाळांत विद्यार्थ्यांच्या आवडीचा खाऊ वाटून विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते. त्यामुळे यंदा कोणत्या कार्यक्रमांची पुनरावृत्ती होते आणि कोणते नवे कार्यक्रम पाहावयास मिळतील याची उत्सुकता प्रत्येक विद्यार्थ्याला लागली आहे.