जळगावच्या भंगार बाजारात 500 रुपयांना लाल दिवा
By admin | Published: February 11, 2017 10:39 PM2017-02-11T22:39:03+5:302017-02-11T22:39:03+5:30
मंत्री, राज्यमंत्री तसेच राज्यमंत्र्याचा दर्जा असलेल्या स्थानिक संस्थेच्या पदाधिकारी व महामंडळाच्या अध्यक्षांच्या वाहनांना शासनाने लाल दिवा प्रदान केला आहे
Next
ऑनलाइन लोकमत/सुमित देशमुख
जळगाव, दि. 11 - मंत्री, राज्यमंत्री तसेच राज्यमंत्र्याचा दर्जा असलेल्या स्थानिक संस्थेच्या पदाधिकारी व महामंडळाच्या अध्यक्षांच्या वाहनांना शासनाने लाल दिवा प्रदान केला आहे. मंत्रालयीन सचिव तसेच आयकर विभागाच्या आयुक्तांनाही लाल दिवा आहे. वाहनावर लाल दिवा असणे प्रतिष्ठेचे व मानाचे समजले जाते, मात्र हाच लाल दिवा जळगावच्या भंगार बाजारात 500 रुपयाला विक्रीला आला आहे.
अजिंठा चौकात असलेल्या भंगार बाजारात हा लाल दिवा आढळून आला. या दिव्याविषयी दुकानदाराला विचारणा केली असता शहरातील एका स्पेअर पार्टच्या दुकानातून खरेदी केलेल्या भंगारात हा दिवा आलेला आहे. खरेदी करावयाची असेल तर त्यासाठी ५०० रुपये मोजावे लागतील, असे दुकानदाराने ‘लोकमत’ प्रतिनिधीला सांगितले.
लाल दिव्याचा गैरवापर
गेल्या काही वर्षापूर्वी दहशतवादी बनावट लाल दिवा असलेल्या कारमधून नागपूर येथील संघाच्या मुख्यालयात शिरले होते. तेव्हा सुरक्षा यंत्रणेचे वाभाळे निघाले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकार व सर्वोच्च न्यायालयाने लाल दिवा वापरासाठी आचारसंहिता ठरवून दिली होती.
त्यानंतर हळूहळू ही आचारसंहिता शिथील झाली. अनेक ठिकाणी चोरटे व गुन्हेगारांनी लाल दिव्याच्या वाहनांचा वापर केल्याचे सिध्द झाले आहे. जळगाव शहराला गुन्हेगारी तसेच दहशतवादी घटनांची पार्श्वभूमी असताना भंगारात लाल दिवा उपलब्ध झाल्याने आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे या दिव्याचा गैरवापर होणार नाही याची शाश्वती काय? असाही प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.