गैरहजर डॉक्टरांना कमी करणार
By admin | Published: August 18, 2015 10:16 PM2015-08-18T22:16:36+5:302015-08-18T22:16:36+5:30
दीपक सावंत : मालवण ग्रामीण रुग्णालयाला सर्व सुविधा देण्याचे आश्वासन
मालवण : राज्यभरात विविध शासकीय रुगणालयात नियुक्ती असूनही गैरहजर तथा रजेवर असणाऱ्या वैद्यकीय अधीक्षक, अधिकाऱ्यांची संख्या ४०० हून अधिक आहे. रुग्णालयात हजर न होणाऱ्या या वैद्यकीय अधिकारी, अधीक्षकांना पुन्हा सेवेत न घेता त्यांचे राजीनामे मंजूर करून याठिकाणी नव्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती केली जाणार आहे.राजीव गांधी जीवनदायी योजनेत जी रुग्णालये व तेथील डॉक्टर रुग्णांकडून जादा पैशांची मागणी करतील किंवा ज्या रुग्णालयान्ाां ही योजना रुग्णांना देणे परवडत नसेल त्या रुग्णालयांना जीवनदायी योजनेतूनही कमी केले जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. जिल्हा दौऱ्यावर असलेल्या आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मालवण ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयाची माहिती जाणून घेताना येथील रिक्तपदे व समस्यांबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पांचाळ यांनी माहिती दिली. यावेळी आमदार वैभव नाईक, सभापती सीमा परुळेकर, नगरसेवक महेश जावकर, नायब तहसीलदार जी. के. सावंत, गटविकास अधिकारी राजेंद्र्र पराडकर, मुख्याधिकारी अरविंद माळी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ, तालुकाप्रमुख बबन शिंदे, हरी खोबरेकर, सेजल परब, नंदू गवंडी, रविकिरण आपटे, सतीश प्रभू, रश्मी परुळेकर, आदी उपस्थित होते. आरोग्यमंत्र्यांसमवेत आरोग्य विभागाचे डायरेक्टर सतीश पवार व जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. मालवण ग्रामीण रुग्णालयात आॅगस्ट २०१३ पासून वैद्यकीय अधीक्षक डॉ. चव्हाण दोन वर्षे गैरहजर आहेत. २६ मंजूर पदांपैकी दहा पदे रिक्त आहेत. शिल्पा झाट्ये, वर्ग २ चे वैद्यकीय अधिकारी पद २००८ पासून रिक्त आहे. त्या गैरहजर आहेत. त्यांचा राजीनामाही मंजूर झाला नाही. त्यामुळे पद भरणे अवघड झाले आहे. त्यांचे मानधन सरू नसले, तरी रुग्णांना गैरसोय नको म्हणून सर्व पदे भरावित. एक्सरे टेक्निशियन, लिपिक यांची पदे भरण्याबाबत आरोग्यमंत्र्यांना सांगण्यात आले. या सर्व पदांबाबत जाहिराती काढून सप्टेंबर, आॅक्टोबरमध्ये सर्व पदे भरली जातील. रुग्णालयास जनरेटर, ब्लड स्टोरेज व सोनोग्राफी टेक्निशियन देण्याबाबत प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले. (प्रतिनिधी)
अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न निकाली
मालवण ग्रामीण रुग्णालय इमारत सीआरझेड क्षेत्रात येत असल्याने येथे असलेल्या जुन्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या इमारत दुरुस्ती, नवी उभारणी अडचणीची होत होती. याबाबत पर्यावरण मंत्रालयाची (एमसीझेडएमए) परवानगी मिळाली आहे.
याबाबतचे पत्रही आपल्याला दिले जाईल. इमारत नूतनीकरणासाठी असलेल्या निधीतून निवासस्थानाची उभारणी करावी, असे आमदार नाईक यांनी आरोग्यमंत्र्यांच्या आदेशाने सांगितले.
ग्रामीण रुग्णालयाला आवश्यक असणारी दुसरी रुग्णवाहिका आमदार निधीतून दिली जाईल, असे आमदार नाईक यांनी स्पष्ट केले.