शिक्षणाद्वारे शेतीवरील बोजा कमी करा

By admin | Published: February 26, 2017 05:21 PM2017-02-26T17:21:27+5:302017-02-26T17:23:32+5:30

ज्या शेतकरी कुटुंबात शिक्षण वाढले, तिथे सुबत्ता आली़ त्यामुळे शिक्षण घ्या, केवळ शेतीवर विसंबून राहू नका

Reduce the burden on agriculture through education | शिक्षणाद्वारे शेतीवरील बोजा कमी करा

शिक्षणाद्वारे शेतीवरील बोजा कमी करा

Next

अविनाश चमकुरे /ऑनलाइन लोकमत
नांदेड, दि. 26 -  ज्या शेतकरी कुटुंबात शिक्षण वाढले, तिथे सुबत्ता आली. त्यामुळे शिक्षण घ्या, केवळ शेतीवर विसंबून राहू नका, जोपर्यंत शेतीवरील लोकसंख्येचा अतिरिक्त बोजा शिक्षणाद्वारे कमी करणार नाही तोपर्यंत प्रगतीच्या वाटा खुलणार नाहीत, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी रविवारी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या १९ व्या दीक्षांत समारंभात केले.
अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा कुलपती सी़ विद्यासागर राव होते. मंचावर पालकमंत्री अर्जून खोतकर, कुलगुरु डॉ़ पंडित विद्यासागर, प्र-कुलगुरु डॉ़ गणेशचंद्र शिंदे, कुलसचिव बी़बी़ पाटील, बीसीयुडी डॉ़ दिपक पानसकर, परीक्षा नियंत्रक डॉ़ रवी एऩ सरोदे यांची उपस्थिती होती़ दीक्षांत भाषणात शरद पवार म्हणाले, भारत हा कृषीप्रधान देश आहे. येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय आजही शेती हाच आहे़ शेतीवर अवलंबून राहणारी लोकसंख्या जेवढी अधिक, तिथे गरिबी अधिक हे समीकरण जगभर दिसेल. ज्या ठिकाणी शेती करणारा वर्ग अन्य क्षेत्रात गेला तिथे स्थिती बदलली आहे. इंग्लंड, जर्मनी, जपान, अमेरिका आदी देशात १२ ते २० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत़ त्यामुळे ते देश प्रगत दिसत आहेत. याउलट भारत, इंडोनेशिया, श्रीलंका, बांग्लादेश या सर्व ठिकाणी लोकसंख्येच्या साठ टक्केपेक्षा अधिक लोक शेतीवर अवलंबून आहेत. म्हणूनच येथे बेरोजगारी, दारिद्र्य पहायला मिळते. याचे मूळ शेतीवर प्रमाणापेक्षा अधिक असलेल्या बोजात आहे. शेतीचे झालेले तुकडीकरण, निसर्गावरील अवलंबित्त्व, वाढती लोकसंख्या आदी कारणे केवळ शेतीवर गुजराण करण्यासाठी बाधक ठरतात. त्यासाठी शेतीवरचा भार कमी होणे गरजेचे आहे़ म्हणून कृषीप्रधान वर्गाला शिक्षण देण्याची त्या शिक्षित वर्गाकडून नवीन साधन-संपत्ती निर्मितीचे मार्ग उपलब्ध करुन देण्याची गरज आहे़ शिवाय शेतीवरील अवलंबित्त्व कमी करणे हाच यावरील उपाय आहे़ आपल्या देशातील पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या ही पंचविशीच्या आतली आहे़ भारतीयांचे सरासरी वय एकोणीस आहे़ ही लोकसंख्या आपली ताकद आहे हे ओळखून शिक्षणाच्या चांगल्या संधी या वर्गाला कशा उपलब्ध होतील यावर तो ‘सामर्थ्य बनेल की ओझे?’ हे अवलंबून असणार आहे़
शिक्षणातून विद्यार्थ्यांना कसं घडवावं, त्यांना राष्ट्रहितासाठी प्रेरीत करुन इतिहास कसा घडवावा, याचे आदर्शवत उदाहरण स्वामी रामानंद तीर्थ होते़ निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त करण्याबरोबरच शिक्षणाची गंगा वाहती करण्याचे प्रयत्न त्यांनी केले़ नांदेड येथील विद्यापीठ उपकेंद्राचे रुपांतर स्वतंत्र विद्यापीठात करण्यासाठी चर्चा झाली़ स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याची जाणीव व्हावी या उद्देशाने नांदेड येथील विद्यापीठास स्वामी रामानंद तीर्थ यांचे नाव देण्याचा निर्णय मुख्यमंत्री असताना घेतल्याचे पवार यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या स्थापनेला दोन दशक होत आहेत़ विद्यापीठ स्थापनेनंतर सुरुवातीच्या काळात डॉ़ जनार्दन वाघमारे यांचे नेतृत्त्व विद्यापीठाला लाभले़ तेव्हापासून अंगिकारलेला विद्यार्थीकेंद्रीत विचार, संशोधनावर भर, उत्तम प्रशासन या सगळ्यांचा परिपाक म्हणजे अलीकडच्या काळात विद्यापीठाने गुणवत्तेच्या बळावर ‘अ’ दर्जा प्राप्त केला आहे़ विद्यमान कुलगुरु डॉ़ पंडित विद्यासागर यांनी सुरु केलेली एक शिक्षक एक कौशल्य योजना, विद्यार्थ्यांना सहाय्य करणारी ‘स्वास’ योजना, श्रेयांक अभ्यासपद्धती पदवीपूर्व स्तरावर सुरु करणारे राज्यातील हे पहीलेच विद्यापीठ असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख पवार यांनी केला. 
कुलगुरु डॉ़ पंडित विद्यासागर यांनी विद्यापीठाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व प्रगतीचा आढावा सादर केला. विविध विद्याशाखेत प्रथम येणाऱ्या ४१ विद्यार्थ्यांना सूवर्णपदक देवून यावेळी गौरविण्यात आले़ शरद पवार यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन मराठी विभाग प्रमुख डॉ़ केशव सखाराम देशमुख यांनी केले. यावेळी आ़ अमरनाथ राजूरकर, आ़ हेमंत पाटील, आ़ प्रताप पा़ चिखलीकर, आ़ नागेश पा़ आष्टीकर, आ़ प्रदीप नाईक, माजी मंत्री कमलकिशोर कदम, विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरु डॉ़ जनार्दन वाघमारे, माजी खा़ भास्कर पा़ खतगावकर, माजी आ़ शंकरअण्णा धोंडगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.

शरद पवार यांना डी.लिट
सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने राज्यपाल तथा कुलपती सी़ विद्यासागर राव यांच्या हस्ते माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना डी़लीट़ या सर्वोच्च मानद पदवीने गौरविण्यात आले़ यापूर्वी २००८ मध्ये पुणे येथील टिळक विद्यापीठ व २०१३ मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने त्यांना डी़लीट़ या उपाधीने सन्मानीत केले आहे. 

कृषीमंत्री झालो तेव्हा देशातील कोठारात मुबलक धान्यसाठा नव्हता़ कृषीप्रधान देश असल्याने विदेशातून धान्य आयात करण्यास मन धजावले नाही़ देशाला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष कृती धोरण अवलंबिले़ परिणामी सद्यस्थितीत तांदळाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार तर साखर, कापूस निर्यातीत भारत दुसऱ्या स्थानी आहे़ याच सार श्रेय शेतात काबाडकष्ट करणाऱ्या लक्षावधी शेतकऱ्यांना जात असल्याचा उल्लेख शरद पवार यांनी भाषणात केला.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत़ आर्थिक अडचण शिक्षणात अडसर ठरु नये या उद्देशाने पवार चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने ५० लाख रुपये स्वारातीम विद्यापीठास देण्याचे शरद पवार यांनी घोषित केले़ ही रक्कम बँकेत डीपॉझीट करुन यातून मिळणाऱ्या व्याजाच्या रक्कमेतून दरवर्षी पाच विद्यार्थ्यांना डॉ़ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले, यशवंतराव चव्हाण,पद्मश्री श्यामराव कदम, शारदाबाई पवार यांच्या नावे शिष्यवृत्ती देण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

Web Title: Reduce the burden on agriculture through education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.