पोलिसांवरील कामाचा ताण कमी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2017 01:34 AM2017-03-11T01:34:21+5:302017-03-11T01:34:21+5:30
राज्यातील पोलीस आठवड्याचे सातही दिवस २४ तास काम करीत असतात. त्यामुळे त्यांचे कामाचे तास कमी करून त्यांच्यावरील ताण कमी करा, असे म्हणत उच्च न्यायालयाने
मुंबई : राज्यातील पोलीस आठवड्याचे सातही दिवस २४ तास काम करीत असतात. त्यामुळे त्यांचे कामाचे तास कमी करून त्यांच्यावरील ताण कमी करा, असे म्हणत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला यासंदर्भात धारेवर धरले. त्याशिवाय दहशतवादी व गुंड एके-४७सारखी अत्याधुनिक शस्त्रे वापरत असताना पोलीस मात्र जुनी-पुराणी रिव्हॉल्व्हर वापरत आहेत, त्यांनाही आॅटोमॅटिक शस्त्रे द्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.
अन्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पोलिसांनाही सर्व सुविधा व भत्ते द्या. त्यांच्या पदोन्नतीसाठी प्रभावी धोरण आखा. त्यामुळे त्यांचे मनोबल वाढेल. कॉन्स्टेबल पदावरचा माणूस हेड कॉन्स्टेबल होऊन निवृत्त होतो. त्यामुळे दर १२ वर्षांनी पदोन्नती द्या. चांगले काम करणाऱ्या पोलिसांना काम करण्यासाठी उत्तम वातावरण उपलब्ध करून द्या, असेही खंडपीठाने म्हटले.
पुण्याच्या अश्विनी राणे यांनी त्यांचे पती निखिल राणे यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. व्यवसायाने विकासक असलेले राणे यांची हत्या २३ नोव्हेंबर २००९ रोजी गोळ्या झाडून करण्यात आली.
स्थानिक पोलिसांच्या हाती काहीच न लागल्याने अश्विनी राणे यांनी या केसचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सीबीआयही या प्रकरणाचा तपास करण्यामध्ये अपयशी ठरली. त्यामुळे उच्च न्यायालयाने पोलीस दलातील त्रुटी दूर करण्यासाठी ही याचिका निकाली न काढता याचिकेची व्याप्ती वाढवली.
न्यायालयाने फटकारले
या याचिकेच्या सुनावणीत सरकारी वकिलांनी मुंबईत सध्या प्रायोगिक तत्त्वावर पोलिसांना आठ तास ड्युटी लावल्याची माहिती खंडपीठाला दिली. त्यावर खंडपीठाने हे धोरण राज्यभर राबवा, अशी सूचना सरकारला केली.
‘आपल्याकडे पोलीस आठवड्याचे सातही दिवस २४ तास काम करीत असतात. त्यांच्यावरील कामाचा ताण कमी करा. याबाबतही धोरण आखण्याचा विचार राज्य सरकारने करावा,’ असेही खंडपीठ हटले.