मोबदला ही ‘लाच’ ठरवून खासगी व्यक्तीला अटक
By admin | Published: September 6, 2015 01:22 AM2015-09-06T01:22:11+5:302015-09-06T01:22:11+5:30
दीनानाथ नाट्यगृहात कार्यक्रम करू इच्छिणाऱ्या संस्थांना त्यासाठी लागणारे विविध परवाने मिळवून देण्याचे काम मोबदला घेऊन खासगी स्वरूपात करून देणाऱ्या अनिल हळणकर नावाच्या व्यक्तीला
अतुल कुलकर्णी, मुंबई
दीनानाथ नाट्यगृहात कार्यक्रम करू इच्छिणाऱ्या संस्थांना त्यासाठी लागणारे विविध परवाने मिळवून देण्याचे काम मोबदला घेऊन खासगी स्वरूपात करून देणाऱ्या अनिल हळणकर नावाच्या व्यक्तीला ‘लाच’ घेतल्याबद्दल ‘रंगेहाथ’ अटक केली गेल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) डोके ठिकाणावर आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
खाजगी व्यक्तीने केलेल्या कामाचा मोबदला मागणेसुद्धा ‘लाच’ ठरते का, असा मुद्दा न्यायालयासमोर उपस्थित झाला आहे. तर दुसरीकडे, हळणकर यांच्यावर वकील लावण्यासाठी दारोदार भटकून पैसे गोळा करण्याची वेळ आली आहे. दीनानाथ नाट्यगृह महापालिकेचे असले तरी ‘एसीबी’ने पकडलेले हळणकर महापालिकेचे कर्मचारी नाहीत. हे नाट्यगृह भाड्याने घेऊन कार्यक्रम करणाऱ्या संस्थांना तिकीटविक्री करण्यासाठी तेथे एक खिडकी आहे. या खिडकीवरून अशा कार्यक्रमांची तिकीटविक्री करण्याचे काम हळणकर करतात. विविध नाट्यसंस्था व कार्यक्रमांचे आयोजक त्यांना दिवसभर तिकीटविक्री केल्याचे ३०० ते ४०० रुपये मानधन देतात. शिवाय पालिकेत जाऊन परवाने आणून देण्याचेही काम ते करतात. त्यासाठी त्यांना या संस्था कधी २०० तर कधी ३०० रुपये देतात. अशा या हळणकरांना ‘लाच’ घेतल्याबद्दल पकडले जाण्याचा प्रकार मोठा रंजक आहे. अंध मुलांसाठी काम करणाऱ्या ‘दृष्टी परिवार’ या संस्थेने २३ सप्टेंबर रोजी संस्थेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम दीनानाथमध्ये आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी त्यांना परफॉरमन्स लायसन्स, पोलीस परवाने आणि अन्य परवाने हवे होते.
‘दृष्टी परिवार’च्या अध्यक्षांनी हे परवाने मिळवून देण्यासाठी हळणकर यांना विचारले. हळणकर यांना हे काम सांगितले. हळणकर यांनी या कामाचा मोबदला घेतो असे सांगितले. त्यावरून त्यांच्यात झालेल्या बोलाचालीनंतर दृष्टी परिवार संस्थेच्या अध्यक्षांनी थेट ‘एसीबी’ कार्यालय गाठले. विविध परवान्यांसाठी हळणकर यांनी १००० रुपयांची मागणी केल्याची तक्रार दिली. ‘एसीबी’नेदेखील तत्परता दाखवत १५ अधिकाऱ्यांची फौज दीनानाथला पाठवली आणि हळणकर यांना ‘रंगेहाथ’ पकडले गेले. त्या वेळी हळकरण सांगत होते की, मी लाच घेत नसून केलेल्या कामाचा मोबदला घेतोय, माझा उदरनिर्वाह त्यावरच आहे. तरीही अधिकाऱ्यांनी ऐकले नाही. एवढ्यावरच हे थांबले नाहीत तर हळणकर राहतात त्या बामणवाडा चाळीतल्या १० बाय २०च्या खोलीची झाडाझडती सहा अधिकाऱ्यांनी रात्रीच जाऊन घेतली. त्याच्या बायकोला खोलीबाहेर बसवून घरातल्या बादल्या, ड्रमपासून मंगळसूत्र, बांगड्यांची नोंददेखील केली गेली. दुसऱ्या दिवशी हळणकर यांना कोर्टात उभे केल्यावर कोर्टसुद्धा ही अजब केस पाहून चाट पडले. तुम्ही रेल्वेचे तिकीट एजंटामार्फत काढता तेव्हा तो जे कमिशन घेतो त्याबद्दल काही तक्रार करता का, असा सवालही कोर्टाने ‘एसीबी’ला केला. शेवटी हळणकर यांना कोर्टाने जामीन मंजूर केला.
हळणकरांची मदतीसाठी हाक
आपण केलेल्या कामाचा मोबदला मागितला तर ती लाच कशी होते? आणि दृष्टी संस्थेला माझ्या कामाचा मोबदला द्यायचा नव्हता किंवा तो त्यांना जास्त वाटत होता तर त्यांनी स्वत:च पालिकेत जाऊन सगळ्या परवानग्या घ्यायच्या होत्या. मला काम सांगायची गरजच नव्हती, असे हळणकर यांचे म्हणणे आहे.
आता कोर्ट-कचेऱ्या करण्यासाठी आपल्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे मला मदत करा, अशी हाक हळणकरांनी कलावंत व नाट्यसंस्थांना घातली आहे. मात्र एसीबीच्या या ‘अति धाडसी’ कारवाईची कलावंत व नाट्यसंस्थांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.
‘एसीबी’ने चौकट ओलांडली? : लाचलुचपत प्रतिबंधक कायदा फक्त सरकारी आणि निम सरकारी कर्मचाऱ्यांनाच लागू आहे. सरकारी कर्मचाऱ्याने त्याचे नेमून दिलेले काम करण्यासाठी कायदेशीर शुल्काखेरीज आणखी पैसे वा मोबदला मागणे (इल्लिगल ग्रॅटिफिकेशन) याला कायद्याच्या भाषेत ‘लाच’ असे म्हटले जाते. लाच घेण्याप्रमाणे लाच देणे हाही गुन्हा असल्याने लाच देणारी व्यक्ती खासगी व लाच घेणारी सरकारी, असे कायद्याचे गृहीतक आहे. ‘एसीबी’ची कार्यकक्षाही याच चौकटीने आखून दिलेली आहे.