पश्चिम महाराष्ट्रातील दूध संकलनात १० लाख लिटरची घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 02:21 PM2019-06-25T14:21:35+5:302019-06-25T14:23:26+5:30
दूध संकलनात घट झाल्याने खरेदी दरामध्ये झाली वाढ; जुलैपासून दरात आणखीन वाढ
सोलापूर: देशभरातील विविध राज्यात असलेल्या दुष्काळामुळेदूध संकलनात वरचेवर मोठी घट होत असल्याने दूधदरात वरचेवर वाढ होत आहे. एकट्या पश्चिम महाराष्ट्रात १० लाख लिटर दूध संकलन कमी झाल्याने गायीच्या दूध खरेदी दरात दोन महिन्यात चार ते सहा रुपयांची वाढ झाली आहे. एक जुलैनंतर खरेदी दरात आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.
मागील वर्षीच्या उन्हाळ्यात व त्यानंतर राज्यात मागणीपेक्षा अधिक दूध संकलन होत होते. त्यामुळे उन्हाळ्यात दूध खरेदीदर वाढण्याऐवजी कमी झाले होते. गायीचे दूध खरेदीदर १७ रुपये लिटरवर आल्यानंतर शासनाने प्रति लिटर ५ रुपये अनुदान सुरू केले. हे अनुदान जानेवारी २०१९ पर्यंत सुरू होते. दूध संकलनात घट होण्यास सुरुवात झाल्यानंतर शासनाने दूध संघांना गायीच्या दुधाला २२ रुपये लिटरचा दर देण्याचे आदेश काढले तर अनुदान प्रति लिटर तीन रुपये देण्यास सुरुवात केली.
तीन महिन्यांनंतर म्हणजे एप्रिलपासून शासनाने अनुदान संपूर्णपणे बंद केले. एकीकडे शासनाचे अनुदान बंद झाले असताना दूध संकलन करणाºया संघांनी दर वाढविण्यास सुरुवात केली. एक मेपासून दुधाचे दर वरचेवर वाढत आहेत. एक मे ते २१ जून या कालावधीत सरासरी चार ते सहा रुपयांनी दूध खरेदीदर वाढले आहेत. २१ जूननंतर दूध खरेदीदर प्रति लिटर २६ रुपयांपासून २८ रुपयांपर्यंत गेला आहे. एक जुलैपासून त्यात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. याचे कारण आहे दूध संकलनात झालेली मोठी घट तसेच तयार पावडरचा साठा कमी झाल्याने पावडरच्या दरातही झालेली वाढ.
एकूणच देशाच्या विविध राज्यात असलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे पावडरची मागणी वाढली, दूध संकलन घटले. राज्यात दूध संकलनात घट झाली असून पश्चिम महाराष्ट्रातच दरदिवशी १० लाख लिटर संकलन घटले आहे. एकट्या सोनाई दूध संघाचे पाच लाख लिटर दूध संकलन घटले असल्याचे सांगण्यात आले. अशाच पद्धतीने राज्यभरात १५ ते २० लाख लिटर दूध संकलन घटले आहे.
पावडरचे दर २८० रुपयांपर्यंत
जानेवारीपर्यंत दूध पावडर शिल्लक असल्याने दूध खरेदीदर वाढत नव्हता. मार्चनंतर दूध पावडरची मागणी वाढली व मागणीप्रमाणे दूध पावडर मिळेनाशी झाली. यामुळे पावडरचा किलोला १८० रुपये असलेला दर २८० रुपयांवर गेला आहे. आता पावडर तयार करण्यासाठी पुरेसे दूध मिळत नसल्याचे सांगण्यात आले.
दूध पंढरीचा दर लिटरला २६ रुपये
- सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचा (दूध पंढरी) एक मे रोजी गायीच्या दुधाचा खरेदीदर २३ रुपये लिटर इतका होता. एक मे रोजी सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ २३ रुपयांचा दर शेतकºयांना देत होता. २१ मेपासून २४ रुपये, एक जूनपासून २५ रुपये व २१ जूनपासून गायीचे दूध २६ रुपयांनी खरेदी केले जात आहे.
मागील वर्षी या कालावधील आमच्याकडे २१ लाख लिटर दूध संकलन होत होते. यावर्षी ते १६ लाखांवर आले आहे. २१ जूनपासून गायीच्या दुधाला शेतकºयांना प्रति लिटर २६ रुपये ५० पैसे दर दिला जातो. एक जुलैपासून २७ रुपये दर करणार आहे.
- दशरथ माने,
अध्यक्ष, सोनाई दूध इंदापूर
जानेवारी महिन्यात पश्चिम महाराष्ट्रात ८० लाख लिटर दूध संकलन होत होते. ते सध्या ७० लाखांवर आले आहे. आणखीन संकलन कमी होईल, असा अंदाज आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे दूध संकलनाला फटका बसला आहे.
- प्रशांत मोहोड,
प्रादेशिक दूग्ध व्यवसाय विकास अधिकारी, पुणे