सीएनजीच्या दरात घट ; जवळपास साडे आठ लाख ग्राहकांना मिळणार दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 09:18 PM2020-10-09T21:18:08+5:302020-10-09T21:18:31+5:30
गॅसचे दर कमी केल्याचा सर्वाधिक फायदा ‘पीएमपी’ला मिळणार
पुणे : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीने घरगुती वापराचा गॅस (पीएनजी) व वाहनांच्या सीएनजी गॅसच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पीएनजीचे दर प्रति किलो ५० पैसे तर सीजएनजीचे ८५ पैशांनी कमी केले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री पासून सुधारित दर लागु होतील, अशी माहिती कंपनीचे वाणिज्य संचालक संतोष सोनटक्के यांनी दिली.
‘एमएनजीएल’चे जवळपास साडे आठ लाख ग्राहक आहेत. त्यापैकी ३० टक्के ग्राहक घरगुती पीएनजी गॅसचे असून उर्वरीत ७० टक्के ग्राहकांमध्ये वाहने व उद्योगांचा समावेश होते. पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) च्या अनेक बससाठी सीएनजीचा वापर केला जातो. त्यामुळे कंपनीकडून पीएमपीला सर्वाधिक गॅस पुरवठा केला जातो. त्यामुळे गॅसचे दर कमी केल्याचा सर्वाधिक फायदा ‘पीएमपी’ला मिळणार आहे.
दरम्यान, शुक्रवारपर्यंत सीएनजीचे दर प्रति किलो ५४ रुपये ८० पैसे तर पीएनजीचे २७ रुपये ७० पैसे एवढे होते. शुक्रवारी मध्यरात्री पासून हे दर अनुक्रमे ५३ रुपये ९५ पैसे व २७ रुपये २० पैसे एवढे असतील. एप्रिल महिन्यामध्येही कंपनीकडून दर कमी करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा पाच महिन्यांनी दरात कपात करण्यात आली. एकीकडे पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत असताना कंपनीकडून गॅसचे दर कमी केले जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळत आहे, असे सोनटक्के यांनी सांगितले.
----------------
सीएनजी व पीएनजीचे सुधारीत दर
गॅस दर (प्रति किलो)
सध्या सुधारीत
सीएनजी ५४.८० ५३.९५
पीएनजी २७.७० २७.२०
---------------------------