रस्ते व पर्जन्य जलवाहिनींच्या तरतुदींमध्ये कपात
By Admin | Published: January 17, 2017 02:41 AM2017-01-17T02:41:07+5:302017-01-17T02:41:07+5:30
नालेसफाई आणि रस्ते विभागातील घोटाळे निस्तरत वर्ष सरल्यामुळे अर्थसंकल्पातील जेमतेम ३० टक्केच रक्कम खर्च झाली आहे
मुंबई : नालेसफाई आणि रस्ते विभागातील घोटाळे निस्तरत वर्ष सरल्यामुळे अर्थसंकल्पातील जेमतेम ३० टक्केच रक्कम खर्च झाली आहे. यामुळे वेळीच शहाणे होत आगामी आर्थिक वर्षात या प्रमुख विभागांच्या खर्चात कपात होणार आहे. पुढच्या महिन्यात निवडणूक असली तरी अर्थसंकल्पात या विभागांमधील प्रकल्पांसाठी कोणतीही मोठी घोषणा होणार नाही.
दरवर्षी ४ फेब्रुवारी रोजी महापालिकेचा अर्थसंकल्प जाहीर होतो. मात्र फेब्रुवारी महिन्यात निवडणुका असल्याने महापालिकेला राज्य निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागणार आहे. तरी तूर्तास हा अर्थसंकल्प बनविण्याची तयारी सध्या सुरू आहे. निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने नगरसेवक या अर्थसंकल्पात केवळ सूचना करू शकतात. मात्र या वेळेस या सूचनांवर अंमल करण्याचे अधिकार आयुक्तांकडे आहेत. त्यामुळे दोन हजार कोटींचा रस्ते घोटाळा व दीडशे कोटींच्या नालेसफाई घोटाळ्यामुळे या विभागांसाठीच्या आर्थिक तरतुदींमध्ये कपात होऊ शकते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
>कपातीची शक्यता
घोटाळा उघड झाल्यामुळे रस्ते विभागाची कामे ठप्प झाली आहेत. परिणामी या विभागांच्या तरतुदींमध्ये २५ ते ३० टक्के कपात होण्याची माहिती महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली.