"कृषी कायद्यातील सुधारणेमुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 06:17 PM2021-01-30T18:17:41+5:302021-01-30T18:18:13+5:30

Kishor Tiwari : सुधारणा व उत्पन्न दुप्पट करण्याच्या नावावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढविणारे धोरण राबविले जात आहे, असे किशोर तिवारी म्हणाले.

"Reforms in agricultural laws increase farmer suicides" - kishor tiwari | "कृषी कायद्यातील सुधारणेमुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या"

"कृषी कायद्यातील सुधारणेमुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या"

googlenewsNext
ठळक मुद्दे'नव्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना कोणताच फायदा होणार नाही'

यवतमाळ : विदर्भासह महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या वाढण्यास कृषी कायद्यातील सुधारणा कारणीभूत असल्याचा आरोप वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला.

ज्या कृषी सुधारणा महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी करण्यात आल्या, याचा परिणाम २००६ पासून होत आहे. काँग्रेसचे धोरण भाजपा सरकारनेही राबविले. त्यामुळे ही स्थिती ओढवली आहे. शेतकऱ्यांना खुल्या बाजारात माल विकण्याची मुभा, भंडारन क्षमता नियंत्रण समाप्त करणे, कार्पोरेट शेतीचे प्रयोग, खासगी बाजार समितीला मान्यता अशा सुधारणा काँग्रेसच्या काळातच करण्यात आल्या. हेच धोरण २०१५ मध्ये भाजपा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राबविले. मात्र, या सुधारणांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट तर सोडाच ते अर्ध्यावर आले. २०१७ व १९ मध्ये शेतकऱ्यांना पुन्हा कर्जमाफी द्यावी लागली. सुधारणा व उत्पन्न दुप्पट करण्याच्या नावावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढविणारे धोरण राबविले जात आहे, असे किशोर तिवारी म्हणाले.

याचबरोबर,  तथाकथित सुधारणांमुळे उत्पन्नात दुप्पट वाढ होणार नाही, त्यासाठी सरकार जोपर्यंत शेतीचा लागवड खर्च कमी करत नाही, रासायनिक खत, औषधी, शेतीमधील सर्वप्रकारची मजुरी याला अनुदान, शेती मालाला हमी भाव व शेतकऱ्यांच्या दारावर विक्री, जमिनीचे पुनरूज्जीवन, गावात साठवण व्यवस्था, प्रक्रिया व्यवस्था, विपणन व्यवस्था व शेतीला दीर्घकालीन पतपुरवठा किमान पाच वर्षांसाठी देणे गरजेचे आहे. याशिवाय, जागतिक पर्यावरण बदल यावर आधारित पीक विमा व्यवस्था करण्याची गरज आहे. या सर्व सुधारणा शाश्वत स्वरूपात करणे गरजेचे आहे, असेही किशोर तिवारी यांनी सांगितले.

सध्याचे शेती संकटात घटणारे उत्पन्न ओळखण्यात अपयश आले आहे. अनुदान मागे घेण्याचा आर्थिक परिणाम, मातीची सुपिकता कमी होत जाणे, पाण्याची पातळी घटणे, लागवडीची वाढती किंमत, शेतकऱ्यांना पिकांना नफा परतावा न मिळणे, वाढ आणि मागणीपेक्षा अतिरिक्त उत्पादन, सदोष आयातीच्या धोरणांमुळे कृषी संकट हे निर्माण झाले आहे. या मानवनिर्मित संकटाचे नियोजन करणे आवश्यक आहे. नव्या सुधारणा कायद्यात याचा कुठलाच विचार केलेला नाही. कोरडवाहू व लहान शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही, असे किशोर तिवारी यांनी सांगितले.

विदर्भभर दौरे करणार...
नव्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना कोणताच फायदा होणार नाही. मुळात केंद्रातील आजपर्यंतच्या सरकारचे कृषी धोरणच चुकीच्या दिशेने राबविले जात आहे, हे शेतकऱ्यांना पटवून दिले जाईल. शाश्वत काय ते बघा, शेतीत पैसा कसा आणता येईल याबाबत शेतकऱ्यांमघ्ये जनजागृती केली जाईल, असे किशोर तिवारी यांनी सांगितले.

Web Title: "Reforms in agricultural laws increase farmer suicides" - kishor tiwari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.