मंत्रिगटात सहभागी होण्यास विखेंचा नकार
By admin | Published: September 29, 2016 01:03 AM2016-09-29T01:03:42+5:302016-09-29T01:03:42+5:30
मराठा समाजाने विराट मूक मोर्चांच्या माध्यमातून मांडलेल्या मागण्यासंदर्भात ठोस पावले उचलण्याऐवजी, मंत्रिगट स्थापन करून राज्य सरकार केवळ वेळकाढूपणा करत आहे
मुंबई : मराठा समाजाने विराट मूक मोर्चांच्या माध्यमातून मांडलेल्या मागण्यासंदर्भात ठोस पावले उचलण्याऐवजी, मंत्रिगट स्थापन करून राज्य सरकार केवळ वेळकाढूपणा करत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला असून, मंत्रिगटातून त्यांनी अंग काढून घेतले आहे.
मराठा मोर्चामध्ये मी केवळ एक कार्यकर्ता आणि नागरिक म्हणून सहभागी झालो होतो. त्याचे नेतृत्व माझ्याकडे नव्हते. त्यामुळे त्यातील मागणीसंदर्भात मी सरकारशी किंवा सरकारच्या वतीने इतरांशी चर्चा करण्याचा प्रश्न येत नाही. सरकारला चर्चाच करायची असेल, तर त्यांनी आयोजन करणाऱ्या संघटनांशी करावी. या संघटनांनी मला चर्चेत सहभागी होण्याची सूचना केली, तरच मी या संदर्भात विचार करू शकेन, असेही विखे पाटील यांनी म्हटले. ‘मंत्रिगट स्थापनेचे निमित्त करून सरकार रोष थंड होण्यासाठी वेळ काढू पाहत आहे,’ असा आरोप गांधी भवन येथे त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)