दहाची नाणी घेण्यास नकार
By admin | Published: June 7, 2017 02:04 AM2017-06-07T02:04:54+5:302017-06-07T02:04:54+5:30
बाजारपेठेत दहाच्या नाण्यांचा सुळसुळाट झाला असून, अनेक नागरिक किरकोळ खरेदीसाठी दहाची नाणी खिशातून बाहेर काढत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
कामशेत : शहरी भागांमध्ये दहाची नाणी बंद झाल्याची अफवा होती. आता हे अफवेचे पेव ग्रामीण भागातही येऊन पोहोचले आहे. त्यामुळे बाजारपेठेत दहाच्या नाण्यांचा सुळसुळाट झाला असून, अनेक नागरिक किरकोळ खरेदीसाठी दहाची नाणी खिशातून बाहेर काढत आहेत. तर हीच दहाची नाणी शहरातील काही सहकारी बँका स्वीकारत नसल्याने व्यावसायिक व नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
दहा रुपयांचे नाणे बंद झाल्याची अफवा मावळात मोठ्या प्रमाणात पसरली आहे. सर्वसामान्य नागरिक व महिला आदींनी दहा रुपयांची नाणी बंद होणार म्हणून आपल्या घरात बचतीसाठी गल्ल्यात टाकलेली दहाची नाणी बाहेर काढली. बाजारपेठेत दहाच्या नाण्यांचा सुळसुळाट झाला आहे. ते किरकोळ विक्रेते व व्यावसायिकांच्या गल्ल्यात दहाच्या नाण्यांचा खच पडू लागला आहे. पण ही नाणी शहरातील काही बँका स्वीकारत नसल्याने या किरकोळ विक्रेते व व्यावसायिकांचा नाईलाज होऊन तेही दहाची नाणी स्वीकारण्यास टाळाटाळ करतात.
>पतसंस्था : कर्मचाऱ्यांना त्रास
पतसंस्था व शहराबाहेरील इतर पतसंस्था यांचे दैनंदिन ठेव प्रतिनिधी बाजारपेठेतील किरकोळ विक्रेते, व्यावसायिक व व्यापारी वर्गांकडून दैनंदिन ठेव गोळा करीत असतात. शहरात दैनंदिन ठेव गोळा करणारे सुमारे ४० ते ५० प्रतिनिधी आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून दहाची नाणी बंद झाली असल्याच्या अफवा उठल्यामुळे त्यांना त्यांच्या पतसंस्थांनी खातेदारांकडून दहाची नाणी स्वीकारू नका असे सांगितले. तसेच बहुतेक सर्वच पतसंस्थांचा आर्थिक व्यवहार पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेशी संलग्न असल्याने, शिवाय कामशेत जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी दहाच्या नाण्यांचा बँकेत भरणा करू नका, असे बजावले असल्याचे पतसंस्थांच्या प्रतिनिधींनी सांगितले. याशिवाय शहरातील दोन सहकारी बँकाही नाणी स्वीकारत नसल्याने तक्रार नागरिक करीत आहेत.
दहाची नाणी भारतीय रिझर्व्ह बँकेने अजून चलनातून बंद केली नसून, जर कोणी ती घेण्यास नकार देत असतील, तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे रिझर्व बँकेकडून कळवण्यात आले आहे. नागरिकांनी व खातेदारांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये.
- सचिन पवार, शाखा व्यवस्थापक, एचडीएफसी बँक